ईशान्य भारतातील सीमावादाच्या आगीत भाजपच्या मंत्र्यानेच ओतले तेल

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सीमावाद सुरू असून, आसाम-मिझोराममध्ये झालेल्या हिंसाचाराने देशभरात खळबळ उडाली आहे.
meghalaya minister support mizoram police over border clash
meghalaya minister support mizoram police over border clash

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलिसांच्या 6 जवानांचा मृत्यू झाला होता. ईशान्य भारतात सीमावाद भडकला असताना यात आता भाजपच्या मंत्र्यांनी तेल ओतले आहे. मेघालयमधील (Meghalaya) भाजप (BJP) नेते व पशुसंवर्धन मंत्री सनबॉर शुल्लाई (Sanbor Shullai) यांनी उघडपणे मिझोराम पोलिसांचे कौतुक करीत हिंसाचाराचे समर्थन केले आहे. 

मेघालय आणि आसाममध्ये सीमावाद सुरू आहे. यावर बोलताना शुल्लाई यांनी नवा वाद निर्माण केला आहे. शुल्लाई यांच्या मागील आठवड्यातच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शुल्लाई म्हणाले की, सीमा आणि जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस दलाचा वापर करण्याची वेळ आता आली आहे. आसामचे लोक आमच्या सीमाभागातील लोकांना त्रास देत असतील तर केवळ चर्चा करुन चहा पिण्याची ही वेळ नाही. आता तेथेच जागेवर उत्तर देण्याची वेळ आहे. 

मी हिंसाचाराच्या बाजूने नाही असे स्पष्ट करुन शुल्लाई म्हणाले की, आपली जनता आणि तिच्या हिताचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पोलीस दलाने यासंदर्भात पुढे पाऊल टाकून आसाम पोलिसांशी चर्चा करायला हवी. मिझोराम पोलिसांसारखे मेघालय पोलिसांनी वागायला हवे. परंतु, आपले पोलीस सीमेच्या संरक्षणाचा मुद्दा आला की कायम बॅकफूटवर दिसतात. आपण नेहमी पाहतो की सामान्य नागरिक आघाडीवर असतात आणि आपले पोलीस मात्र, मागे असतात. 

तुमच्या घरी शत्रू आला आणि त्याने तुमच्यावर आणि तुमच्या पत्नी मुलांवर हल्ला केल्यास स्वसंरक्षणासाठी लढावे लागेल. आपल्या सीमेवरही हेच घडायला हवे. शत्रूने येऊन तुमच्या घरी चोरी केल्यास तुम्हाला स्वत:चे रक्षण करायला हवे. मग ते कायदेशीर असो अथवा बेकायदा. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सीमावाद सोडवण्याची आश्वासने दिली. परंतु, 50 वर्षांपासून एकाही पक्षाने हा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे आपल्यालाच आता आत्मपरीक्षण करावे लागेल, असेही शुल्लाई यांनी स्पष्ट केले. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com