नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात (India) वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजच्या घडीला या आजाराचे 28 हजार 252 रुग्ण असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत.
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा साथीचा रोग जाहीर करण्याची सूचना केली होती. तसेच, या आजाराच्या रुग्णांचा आकडे केंद्राकडे सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना संकटामुळे आधीच कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेसमोर आता म्युकरमायकोसिसचे आव्हान निर्माण झाले आहे. देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, देशात म्युकरमायकोसिसचे 28 हजार 252 रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 6 हजार 339 रुग्ण असून, त्याखालोखाल गुजरातमध्ये 5 हजार 486 रुग्ण आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी 86 टक्के हे कोरोना रुग्ण आहेत. याचबरोबर 62.3 टक्के रुग्ण हे मधुमेहाचा विकार असलेले आहेत.
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा केंद्र सरकारकडून घेतला जातो. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात अॅम्फोटेरीसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येतो. असे असले तरी या इंजेक्शनचा तुटवडा असून, राज्यांना पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. यात भाजपचे सरकार असलेली राज्येही आहेत.
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.