स्वयंपाकाचा गॅसही आजपासून महागला..जाणून घ्या नवीन दर - lpg cylinder rates hiked by 25 rupees from today onwards | Politics Marathi News - Sarkarnama

स्वयंपाकाचा गॅसही आजपासून महागला..जाणून घ्या नवीन दर

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली आहे. 

विनाअंशदानित गॅस सिलिंडरसाठी आजपासून 25.50 रुपये जादा द्यावे लागणार आहेत. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 843.50 रुपयांवर गेली आहे. देशात एलपीजी सिलिंडरची सर्वांत जास्त किमत चेन्नईत आहे. चेन्नई एलपीजी सिलिंडर 850.50 रुपयांना आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही 76 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

हेही वाचा : अजितदादांच्या चौकशीचा चेंडू अमितभाईंच्या कोर्टात 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. विमान इंधनाच्या दरात 2 हजार 354 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने ते आता 68 हजार 263 रुपयांवर पोचले आहे.

जनतेच्या खिशाला कात्री 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आधी वर्षाला 72 हजार 160 कोटी रुपये मिळत होते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या दहा महिन्यांतच सरकारने यातून 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई केली. याचवेळी सर्वसामान्यांचा विचार करता 2014 पासून त्यांच्या उत्पन्नात केवळ 36 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख