वाढता वाढता वाढे..चालू वर्षात एलपीजी सिंलिंडर तब्बल 165 रुपयांनी महागला

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
वाढता वाढता वाढे..चालू वर्षात एलपीजी सिंलिंडर तब्बल 165 रुपयांनी महागला
lpg cylinder price hiked by 165 rupees in current year

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ झाली आहे. 

विनाअंशदानित गॅस सिलिंडरसाठी 25 रुपये जादा द्यावे लागतील. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 859.50 रुपयांवर गेली आहे. देशात एलपीजी सिलिंडरची सर्वांत जास्त किमत कोलकता आहे. कोलकत्यात एलपीजी सिलिंडर 886 रुपयांना आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. याआधी 1 जुलैला सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.  

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. चालू वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

जनतेच्या खिशाला कात्री 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

Related Stories

No stories found.