आधी मंत्रिपद नाकारुन राजीनाम्याचा इशारा अन् नंतर निमूटपणे बसले खुर्चीवर

मंत्रिपद मिळालेल्या आनंदसिंह यांनी कमी महत्वाचे खाते मिळाल्याने राजीनामा देण्याची तयारी केली होती.
karnataka minister anand singh takes charge of ministry
karnataka minister anand singh takes charge of ministry

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. मंत्रिपद मिळालेल्या आनंदसिंह (Anand Singh) यांनी कमी महत्वाचे खाते मिळाल्याने राजीनामा देण्याची तयारी केली होती. यामुळे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या अडचणीत वाढ झाली होती. अखेर आनंदसिंह यांनी त्यांना दिलेल्या खात्याचा पदभार निमूटपणे स्वीकारला आहे.  

अखेर सिंह यांनी पर्यावरण आणि पर्यटन विभागाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनीच ही माहिती दिली आहे. यामुळे त्यांची समजूत काढण्यास मुख्यमंत्री यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. बोम्मई यांनी नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले होते. आनंद सिंह (Anand Singh) यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन विभाग देण्यात आला. यावरुन आनंद सिंह हे नाराज झाले होते. सिंह हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत राजकारण्यांपैकी ते एक आहेत. राज्यातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडणाऱ्या 17 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येडियुरप्पांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. 

खातेवाटपावरुन सिंह यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला होता. आता त्यांनी होस्पेटमधील त्यांचे कार्यालय बंद केले आहे. त्यामुळे ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होस्पेटमधील वेणूगोपाल मंदिरात त्यांनी पूजा केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी 15 वर्षे राजकारणात आहे. काही नेते आणि मित्र माझे संरक्षण करतील, असा माझा चुकीचा समज होता. मी आता सर्व आशा गमावून बसलो आहें. ईश्वराने आता मला जे योग्य आहे ते करण्याचा आत्मविश्वास द्यावा, तर मग ते माझे बलिदानही का असेना.

खातेवाटपात मुख्यमंत्र्यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. बी.एस. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात आधी असलेले ज्येष्ठ नेते के.एस.ईश्वरप्पा यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज विकास खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आर.अशोक यांच्याकडे महसूल, बी.श्रीरामुलू यांच्याकडे परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण खाती सोपवण्यात आली आहेत. लिंगायत नेते व्ही.सोमण्णा यांच्याकडे गृहनिर्माण, पायाभूत विकास तर प्रभू चव्हाण यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले अरगा ज्ञानेंद्र आता गृह खाते सांभाळतील. गोविंद मक्तप्पा करजोळ यांच्याकडे मोठे व मध्यम सिंचन खाते देण्यात आले आहे. मुरुगेश निरानी यांनी मोठे व मध्य उद्योग आणि उमेश कत्ती यांनी वन व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. डॉ.के.सुधाकर यांच्याकडी आरोग्य खाते आणि डॉ.अश्वत नारायण यांच्याकडील उच्च शिक्षण खाते कायम ठेवण्यात आले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com