येडियुरप्पांचा उत्तराधिकारी पुत्रच? विजयेंद्र यांनी दिल्लीत घेतली नड्डांची भेट

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली.
येडियुरप्पांचा उत्तराधिकारी पुत्रच? विजयेंद्र यांनी दिल्लीत घेतली नड्डांची भेट
karnataka cm yediyurappa son vijyendra meets j p nadda in delhi

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांचे पुत्र व राज्य भाजपचे (BJP) उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P.Nadda) यांची भेट घेतली. यामुळे येडियुरप्पांचे उत्तराधिकारी म्हणून विजयेंद्र यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड बंड पुकारले आहे. येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र हे 'सुपरसीएम' असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत आहेत. आज विजयेंद्र यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. यामुळे येडियुरप्पांचे उत्तराधिकारी विजयेंद्र ठरतील, या  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेने जोर पकडला आहे. 

येडियुरप्पांना हे राज्यातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडू नये यासाठी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाला उघड इशारा दिला होता. याचबरोबर लिंगायत समाजाच्या काँग्रेस आमदारांनाही भाजपला इशारा दिला होता. यामुळे येडियुरप्पांच्या जागी लिंगायत नेताच मुख्यमंत्री बनावा, असा आग्रह विजयेंद्र यांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांना हटवून इतर समाजातील नेता मुख्यमंत्री बनवल्यास भाजपचा हा हक्काचा मतदार दुरावला जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून लिंगायत नेताच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

भाजपची विधिमंडळ बैठक 25 जुलैला होणार असून, यात येडियुरप्पांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. येडियुरप्पांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी अखेर मौन सोडले होते. ते म्हणाले होते की, मला पक्षाचे केंद्रीय नेतृत्व 25 जुलैला जो आदेश देईल, त्याचे पालन मी करेन. मी माझे काम 26 जुलैपासून सुरू करेन. राज्यातील भाजप सरकारला 2 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त 26 जुलैला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पक्षश्रेष्ठी देतील त्या आदेशाचे मी पालन करेन. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in