मोदींची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' जोरात...बांगलादेश, नेपाळसह आफ्रिकेतील देशांनाही कोरोना लशीची भेट

मोदी सरकारने कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध घालले असले तरी सरकारकडून अनेक देशांना कोरोना लशीचे डोस भेट देण्याचे सत्र सुरू आहे.
indian government gives covid vaccines to nepal and other countries
indian government gives covid vaccines to nepal and other countries

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बांगलादेशला कोरोना लशीचे 12 लाख डोस भेट म्हणून दिले होते. त्याआधी सरकारने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींचे डोस भेट म्हणून दिले होते. त्यांच्या या 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता सरकारने नेपाळ, पॅराग्वे, झिम्बाब्वे यासह इतर देशांना कोरोना लशीचे डोस भेट दिले आहेत. 

सरकारने 26 मार्चपासून अनेक देशांना सुमारे 5 लाख डोस भेट दिले आहेत. यात पॅराग्वे आणि फिजीला प्रत्येकी 1 लाख डोस देण्यात आले आहेत. झिम्बाब्वेला 35 हजार तर नायजेरला 25 हजार डोस देण्यात आले आहेत. नेपाळी सैन्याला 1 लाख आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेला 2 लाख डोस देण्यात आले आहेत. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या पॅलेस्टाईनमधील कोव्हॅक्स सुविधेसाठी आणखी 25 हजार डोस भारत देणार आहे. 

नेपाळी सैन्याला काल (ता.30) भारतीय लष्कराने 1 लाख डोस दिले. भारतीय दूत विनय मोहन यांनी नेपाळचे सैन्यप्रमुख जनरल पुरणचंद्र थापा यांच्याकडे हे डोस सोपवले. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख एम.एम.नरवणे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या वेळी दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला. 

मोदी नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा होता. मोदींचे बांगलादेशातील ढाक्यात आगमन झाल्याबरोबरच त्यांच्यासोबत 12 लाख कोरोना लशीचे डोस दाखल झाले होते. एअर इंडियाच्या विशेष विमानाने शंभर बॉक्समध्ये हे लशीचे डोस पाठवण्यात आले. याआधी भारताने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींची भेट दिली होती. हे डोस कोव्हिशिल्ड या लशीचे होते. 

मोदींनी 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' राबवली आहे. परंतु, या देशांकडून आणखी डोसची मागणी होत असल्याने सरकारसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. या देशांची मागणी पुरवल्यास सरकारसमोर मोठे संकट निर्माण होईल. कारण देशात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशात संसर्गाचा वेग वाढू लागल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात सर्वांत मोठी अडचण ही लशीच्या तुटवड्याची आहे. या देशांच्या वाढीव मागणीमुळे केंद्र सरकारसमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com