'सिरम'ची लस आता 55 वर्षांखालील व्यक्तींना नाहीच; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय

ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या व सिरमने उत्पादित केलेल्या कोरोना लशीचा वापर जगभरातील अनेक देश करीत आहेत.
canada government pauses astrazeneca vaccine for people under 55
canada government pauses astrazeneca vaccine for people under 55

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर जगभरातील अनेक देश करीत आहेत. या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. आता 55 वर्षांखालील व्यक्तींना ही लस देणे थांबवण्याचा निर्णय कॅनडा सरकारने घेतला आहे. या लशीचे धोके आणि फायदे यांचा पुन्हा अभ्यास करण्यात येईल, असे कॅनडाने म्हटले आहे. 

कॅनडातील राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीने म्हटले आहे की, या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे समोर आले आहे. परंतु, किती प्रमाणात हे दुष्परिणाम दिसत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, रक्ताच्या गुठळ्या निर्माण झालेल्यांपैकी 40 टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. याचमुळे 55 वर्षांखालील व्यक्तींना ही लस देण्याचे कोणते फायदे होत आहेत याबद्दल अनिश्चितता आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या वृद्ध रुग्णांना या लशीचे दुष्परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन त्यांना कोरोना लस देता येईल. या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले होते. तर काही ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. कॅनडात आतापर्यंत 3 लाख 7 हजार जणांना ही लस देण्यात आली असून, तिचा कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर काही दिवसांपूर्वी थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे समोर आले होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए)  तपासणी सुरू होती. 

अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने नुकतीच केली. जागतिक आरोग्य संघटननेनही (डब्लूएचओ) ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. यानंतर युरोपीय देशांनी या लशीचा कोरोना लसीकरणासाठी पुन्हा वापर करण्यास सुरवात केली आहे. यात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, लिथुआनिया, लॅटिव्हिया, स्लोव्हेनिया आणि बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. 

आधी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी या लशीचा वापर थांबवला होता. त्यानंतर जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला होता. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले होते. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला होता. आता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आल्याने पुन्हा वेगाने लसीकरण सुरू झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com