अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा सहा महिन्यांपूर्वीच प्लॅन अन् डोवाल, जयशंकर सूत्रधार

अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा प्लॅन भारताने सहा महिन्यांपूर्वीच आखला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
india started afghanistan evacuation plan from last six months
india started afghanistan evacuation plan from last six months

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. भारताचे (India) परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान यांच्यासह सुमारे दोनशे जण काबूलमध्ये अडकले होते. भारताने त्यांची सुटका केली आहे. परंतु, अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा प्लॅन भारताने सहा महिन्यांपूर्वीच आखला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर (S. Jaishankar) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे याचे सूत्रधार होते. 

अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करणार हे आधीच स्पष्ट दिसू लागले होते. यामुळे अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा प्लॅन भारताने सहा महिने आधीच आखला होता. अफगाणिस्तानमधून कधी आणि केव्हा बाहेर पडायचे याचा आराखडा तयार करण्यात आला होता. अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावासात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल, हेसुद्धा ठरवण्यात आले होते. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सर्व परिस्थितीवर सुरवातीपासून लक्ष ठेवून होते. बदलत्या परिस्थितीनुसार हे दोघे सर्व निर्णय घेत होते. 

अफगाणिस्तानमधून कायमस्वरुपी बाहेर पडायचे का हा प्रश्न सरकारसमोर होता. मागील दोन दशकांत अफगाणिस्तानसोबत भारताने वेगळे संबंध प्रस्थापित केले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारताकडून 34 विकास प्रकल्प राबवल्याने सगळ्यात सुरवातीला बाहेर न पडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तालिबानची आगेकूच सुरू झाल्यानंतर भारतीय दूतावास बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याची सुरवात कंदाहारपासून झाली. नंतर मझार ए शरीफबाबत निर्णय घेण्यात आला. 

अखेर काबूलच्या बाबतीत गुंतागुंत फारच वाढली होती. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेल्याने सगळीच समीकरणे बिघडली. काबूल विमानतळावर हजारोंचे लोंढे येऊ लागल्याने भारतीय कर्मचाऱ्यांना मायदेशी आणणे अवघड बनले होते. ही परिस्थिती 15 व 16 ऑगस्टला आणखी बिघडली. याचबरोबर भारतीय दूतावासावर तालिबानचीही नजर होती. अनेक देशांचे दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये असलेल्या उच्च सुरक्षेच्या ग्रीन झोनमध्येही तालिबानने घुसखोरी केली होती. भारतात प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांना व्हिसा देणाऱ्या शाहिर व्हिसा एजन्सीवरही तालिबानने छापा मारला होता.

भारतीय हवाई दलाच्या विमानातून सुरवातीला 45 जणांची सुटका करण्यात येणार होती. परंतु, 16 ऑगस्टला त्यांना तालिबानने अडवले. यातील काही जणांच्या वस्तू तालिबानने काढून घेतल्या. काबूल विमानतळावरील गोंधळातूनच भारताचे विमान सुमारे 45 कर्मचाऱ्यांना घेऊन तेथून निघाले. परंतु, नंतर काबूल विमानतळावरील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उरलेल्या कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढणे अवघड झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेच्या मदतीने अखेर 17 ऑगस्टला सकाळी उरलेल्या सुमारे 150 भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन भारतीय विमानाने उड्डाण केले. या पद्धतीने सर्व भारतीय कर्मचारी अफगाणिस्तानातून सुखरुपपणे बाहेर पडले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com