गनिमी काव्याने आमदार लांडगे सांगलीतील जरेगावात पोचले अन् पळवले बैलगाडे!

भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे हे पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याने जरेतील बैलगाडा घाटात पोचले. त्यांनी बैलगाडा पळवत इतर शौकिनांबरोबर हुर्योही केली.
bjp mla mahesh landge paticipate in bullock cart race in sangli
bjp mla mahesh landge paticipate in bullock cart race in sangli

पिंपरी : भाजपचे (BJP) विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी आज पहाटे सांगली जिल्ह्यात आटपाडीतील जरे गावात संचारबंदी असूनही सरकारच्या नाकावर टिच्चून बंदी असलेली बैलगाडा शर्यत (BullockCart Race) भरून दाखवली. या वेळी त्यांना शर्यतीच्या ठिकाणी जाणं जमलं नाही. मात्र, भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे पैलवान व बैलगाडा शौकीन आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी करून दाखवलं. ते पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याने जरेतील बैलगाडा घाटात पोचले व त्यांनी बैलगाडा पळवत इतर शौकिनांबरोबर हुर्रे केली.

ही शर्यत होऊच नये म्हणून जरेच नाही, तर लगतच्या आठ गावांतही संचारबंदी लागू करण्यात आली होती. शर्यत होणारा जरेतील बैलगाडा घाट पोलिसांनी ती होऊच नये म्हणून खणून ठेवला होता. मात्र, रात्रीतच पडळकर समर्थकांनी हा घाट दुसरीकडे तयार केला आणि पहाटे सहा वाजता तेथे बारीही करून दाखवली. त्यावेळी पडळकरांना तेथे उपस्थित राहणे जमले नाही. ते शर्यत झाल्यावर तेथे पोचले. मात्र, लांडगे हे गनिमी कावा करीत पोलिसांच्या हाती तुरी देत तेथे पोचले .त्यांनी शर्यतीत भाग घेत तिचा आनंदही लुटला. त्यासाठी त्यांनी आपली मोटार जरे गावाच्या वीस किलोमीटर अलीकडेच सोडली. 

तेथून आमदाराचा डौल व बडेजाव बाजूला ठेवीत सर्वसामान्यांप्रमाणे ते दुचाकीवरून स्थानिकासारखे  पोलिस नसलेल्या मार्गावरून जरे गावाच्या अलिकडे पोचले. तेथून,तर ते चालतच गावात आणि बैलगाडा घाटावर गेले. यावेळी त्यांनी गोवंश टिकवण्यासाठी ही शर्यत पुन्हा सुरु होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. कारण गेल्या तीन वर्षांत तीस लाख देशी गाईचा गोवंश संपल्याच्या गंभीर व काळजी करायला लावणाऱ्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. तो जगावा, टिकावा, रहावा यासाठी ही शर्यत पुन्हा सुरु होणार आहे, हा आत्मविश्वास शेतकऱ्यांत निर्माण व्हावा म्हणून ही शर्यत होण्याची गरज होती, असे ते म्हणाले.ती झाल्याने आता आपली जनावरे म्हणजेच बैल कसायाकडे जाणार नाहीत, हा विश्वास बळीराजाला आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक व त्यांच्या संघटनेने ही शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी लांडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करीत असून त्याला निश्चित यश येईल, असा विश्वास त्यांनी त्यावेळी या शिष्टमंडळाला दिला होता. तो देण्यासाठी ते काल (ता.१९) पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयातून दुपारी थेट सांगलीकडे मोटारीने रवाना झाले. दरम्यान,बंदी असलेली ही शर्यत न्यायालयाचा आदेश झुगारून व कोरोना नियमांचे उल्लंघन करून भरविल्याने पडळकर, लांडगे व ही शर्यत आयोजकांविरुद्ध पोलिस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com