मोठा दिलासा : देशात 45 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या एवढ्या खाली घसरली - india records lowest daily covid case count in last 45 days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मोठा दिलासा : देशात 45 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या एवढ्या खाली घसरली

वृत्तसंस्था
शनिवार, 29 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. 

नवी दिल्ली : देशातील (India) कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात मागील 24 तासांत 1 लाख 73 हजार रुग्ण सापडले असून, मागील 45 दिवसांतील ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे. देशात सलग 16 दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. ही अतिशय दिलाशाची बाब असल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  73  हजार 790 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 617 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख  22 हजार 512 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 45 दिवसांत पहिल्यांदाच एवढी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. देशातील रुग्णसंख्या 25 मेपासून 2 लाखांच्या खाली आली आहे. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : सुटी न मिळाल्याने कोरोनाबाधित बँक व्यवस्थापक ऑक्सिजन सिलिंडरसह ड्युटीवर 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 22 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला होता. रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र होता. ही संख्या कमी होऊ लागल्याने हळूहळू आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 724 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 8.04 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.80 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 51 लाख 78 हजार 11 आहे. याचवेळी मृत्यूदर वाढून 1.16 टक्के झाला आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख