भारताने अमेरिकेला केले ओव्हरटेक...कोरोना लसीकरणाची अशीही कामगिरी - india overtakes us in total covid vaccine dose given to people | Politics Marathi News - Sarkarnama

भारताने अमेरिकेला केले ओव्हरटेक...कोरोना लसीकरणाची अशीही कामगिरी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू असली तरी सरकारने लसीकरणावरील भर वाढवला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत घट सुरू असली तरी सरकारने लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. भारताने (India) कोरोना लसीकरणात एक मैलाचा टप्पा गाठला असून, आता अमेरिकेला (USA) मागे टाकले आहे. भारताने कोरोना लशीचे आतापर्यंत 32.36 कोटी डोस दिले असून, अमेरिकेने 32.33 कोटी डोस दिले आहेत. परंतु, लोकसंख्येच्या प्रमाणात पाहता अमेरिकेतील प्रमाण भारताच्या तब्बल आठपट आहे.  

मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 46 हजार 148 रुग्ण सापडले असून, 979 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर पोचली आहे. याचबरोबर एकूण कोरोना मृत्यू 3.96 लाखांवर गेले आहेत. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. 

देशातील एकूण 5.6 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याचवेळी अमेरिकेत 40 टक्के प्रौढ लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात भारताने 3 कोटी 91 लाख डोस दिलेले आहेत. ही डोसची संख्या कॅनडा, मलेशिया आणि सौदी अरेबिया या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

हेही वाचा : विक्रमी लसीकरणाचा दावा खोटा 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख