यामुळेच कोरोनासमोर मोदी सरकार हरले; 'आयएमए'ने मांडले प्रमुख 5 मुद्दे - IMA says Narendra Modi government failed to manage covid second wave | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

यामुळेच कोरोनासमोर मोदी सरकार हरले; 'आयएमए'ने मांडले प्रमुख 5 मुद्दे

वृत्तसंस्था
शनिवार, 8 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशातील या संकटाला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या देशातील डॉक्टरांच्या शिखर संघटनेने केला आहे. कोरोना संकटात मोदी सरकार अपयशी कसे ठरले याचे पाच प्रमुख मुद्दे आयएमएने मांडले आहेत. 

देशातील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. या पार्श्वभूमीवर आयएमएने सरकारला धारेवर धरले आहे. आयएमएने पाच प्रमुख मुद्दे मांडले आहेत. 

1) वस्तुस्थिती न पाहता निर्णय 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची हाताळणी करण्यात केंद्रीय आरोग्यमंत्री अपयशी ठरले आहेत. तज्ञांनी दिलेला सल्ला आणि वस्तुस्थिती न पाहता सरकार निर्णय घेतेय. 

2) संपूर्ण लॉकडाउन न करणे 
अनेक तज्ञांनी सरकारला देशभरात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, सरकारने लॉकडाउन न लावल्याने आता दररोजची रुग्णसंख्या 4 लाखांवर पोचली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी लावलेले लॉकडाउन आणि रात्रीची संचारबंदी संसर्गाची साखळी तोडण्यास पुरेसे नाहीत.  

3) अयशस्वी कोरोना लसीकरण मोहीम 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन टप्प्यात लसीकरण करण्याची घोषणा केली. परंतु, त्यांच्याच आरोग्य मंत्रालयाने याचा बोजवारा उडवला. लशीच्या टंचाईमुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचबरोबर लशीची एक किंमत साधी सरकारला निश्चित करता आली नाही. वेगवेगळ्या कंपन्यांची लस वेगवेगळ्या किमतीला आहे. देशातील आधीच्या पोलिओ लसीकरणाचा आदर्श घ्यायला हवा होता. तो घेतला असता तर देशातील जनतेचे मोफत कोरोना लसीकरण यशस्वीरीत्या झाले असते, असे आयएमएने म्हटले आहे. 

4) ऑक्सिजन टंचाई 
देशात ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन असतानाही आज टंचाई जाणवत आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसत आहे. याला सरकारची सदोष वितरण व्यवस्था कारणीभूत आहे. जनतेच्या जीवाशी निगडित वस्तूच्या वितरणातही सरकारकडून हलगर्जीपणा सुरू आहे. 

5) रुग्णसंख्या लपवणे 
सरकार कोरोना रुग्णांचे आकडे लपवत आहे. यामागे नेमके कारण काय आहे? आरटी-पीसीआरमध्ये निगेटिव्ह आलेले पण सीटी-स्कॅनमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नोंद देशात केली जात नाही, असा गंभीर आरोपही 'आयएमए'ने केला आहे. 

देशात 24 तासांत 4 लाखांहून अधिक रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा : मोदी सरकार झोपलेलेच...सर्वोच्च न्यायालयाने अखेर हाती घेतली सूत्रे 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 23 हजार 446 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.01 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.90 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270) 
महाराष्ट्र : 898  
कर्नाटक : 592 
उत्तर प्रदेश : 372 
दिल्ली : 341 
छत्तीसगड : 208 
तमिळनाडू : 197 
पंजाब : 165 
राजस्थान : 164 
हरियाना : 162 
उत्तराखंड : 137 
झारखंड : 136 
गुजरात : 119 
पश्चिम बंगाल : 112 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख