विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणाले, जोराने बोलू नका हो, कोरोना पसरेल! - himachal pradesh assembly speaker said dont speak loudly covid19 will spread | Politics Marathi News - Sarkarnama

विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणाले, जोराने बोलू नका हो, कोरोना पसरेल!

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

जोरात बोलण्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे वक्तव्य हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी केले आहे. त्यांच्या विधानावर सभागृहातील सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 
 

सिमला : जोरात बोलण्यामुळेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे वक्तव्य हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष विपिन सिंह परमार यांनी लावला आहे. त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच सर्व सदस्यांना सांगितले. तसेच, कोरोना रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावर  सभागृहात उपस्थित सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. 

राज्यातील आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत  आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. भाजपच्या आमदार रिता देवी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. भाजपचे आमदार परमजित सिंह पम्पी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते बरे झाल्याने आज सभागृहात उपस्थित राहिले. यावेळी त्यांचे अध्यक्षांनी स्वागत केले. त्यांना १७ ऑगस्टला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

तसेच, वीजमंत्री सुखराम चौधरी हे काल आणि आज सभागृहात हजर होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  याचबरोबर जलशक्तीमंत्री महेंद्रसिंह ठाकूर आणि नालागडचे काँग्रेसचे आमदार लखविंदर सिंह राणा यांनाही बाधा झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे अधिकाधिक पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आज दुसरा दिवस होता. या वेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष परमार म्हणाले की, लॉकडाउनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जोरात बोलल्यामुळेही कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि तो नियंत्रित ठेवण्यासाठी सभागृहात आमदारांनी एकमेकांशी किंवा बाजू मांडतांना सौम्य आवाजात बोलावे. 

अध्यक्षांच्या या वक्तव्यावर उपस्थित आमदारांमध्ये हशा पिकला. काल विरोधी पक्षाकडून दाखल झालेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आमदारांनी मोठ्या आवाजात चर्चा केली होती. याची पार्श्वभूमी अध्यक्षांच्या विधानामागे होती. 

हे ही वाचा : अँटीबॉडीजमुळे कोरोनापासून संरक्षण नाही

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर वाढलेला असून, रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी पोचला आहे. तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर कोरोनाच्या संसर्गापासून तुमचा बचाव होऊ शकतो, असा मतप्रवाह संशोधकांमध्ये होता. आता नव्या संशोधनांतून याला छेद मिळाला आहे. अँटीबॉडीजमुळे नेहमीच कोरोना अथवा सार्सच्या विषाणूंपासून संरक्षण होत नाही. या अँटीबॉडीज मानवी शरीरामध्ये किती काळ टिकतात आणि टिकाव धरणारे त्यांचे अन्य उपप्रकार कोणते आहेत, याचा अंदाज करणे कठीण असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख