प्रदेशाध्यक्षांसह आमदारांनी विरोध केला पण काँग्रेस हाय कमांडचं वजन मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात!

प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच त्यांनी पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या आहेत.
harish rawat says punjab election will be fought under amarinder singh
harish rawat says punjab election will be fought under amarinder singh

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी उघड बंड पुकारले होते. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच त्यांनी पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या आहेत. परंतु, काँग्रेस हाय कमांडने अमरिंदर हेच राज्यात कॅप्टन असतील, हे स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्र्यांविरोधात आमदार व मंत्र्यांनीच आघाडी उघडली असून त्यांना बदलण्याची जोरदार मागणी सुरू झाली आहे. त्यापैकी चार मंत्री आणि तीन आमदारांनी आज पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांची उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे भेट घेतली. पंजाबची 2022 मधील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल, असे रावत यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले. यामुळे सिद्धू यांनी कितीही विरोध केला तरी पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदल होणार नाही, असे स्पष्ट संकेत हाय कमांडने दिले आहेत. 

काँग्रेसच्या मंत्र्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सिध्दू यांनी नेमलेल्या चार सल्लागारांपैकी दोघांनी मागील आठवड्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली होती. माहिती नसलेल्या विषयांवर बोलू नये, अशी तंबी देत त्यांनी थेट सिध्दू यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा बंडखोर आमदारांनी डोकं वर काढलं असून, मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. यामागे सिध्दू यांचाच हात असल्याची चर्चा पंजाबमध्ये आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com