एकमेव नगरसेवक असलेल्या महापालिकेतही मनसे स्वबळावरच लढणार!
mns will go solo in pimpari chinchwad municipal corporation

एकमेव नगरसेवक असलेल्या महापालिकेतही मनसे स्वबळावरच लढणार!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील स्वबळाच्या शिवसेना व काँग्रेसच्या तयारीनंतर आता मनसेनेही ही तयारी सुरु केली आहे.

पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील स्वबळाच्या शिवसेना (Shivsena) व काँग्रेसच्या (Congress) तयारीनंतर आता मनसेनेही (MNS) ही तयारी सुरु केली आहे. सहा महिन्यांवर आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) निवडणुकीच्या जोरबैठका काढण्यास मनसेने सोमवारपासून (ता.२३) सुरवातही केली. सध्या एक नगरसेवक असलेल्या पिंपरी महापालिकेत २०२२ ला दहा-पंधरा नगरसेवक दिसतील, असा दावा मनसेचे शहराध्यक्ष व शहरातील एकमेव नगरसेवक सचिन चिखले (Sachin Chikhale) यांनी आज केला

आघाडी वा युतीचा निर्णय राजसाहेब घेतील, हे स्पष्ट करीत तूर्तास स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे चिखले यांनी 'सरकानामा'ला सांगितले. पिंपरी महापालिकेच्या १२८ जागांपैकी ७८ म्हणजे साठ टक्क्यांहून अधिक जागांवर इच्छुक मिळाल्याने त्या जागा लढण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

येत्या डिसेंबर, जानेवारीत राज्यात होणाऱी नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक ही बहूसदस्यीय ऐवजी एकसदस्य पद्धतीने घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यादृष्टीने प्रारुप कच्चा प्रभाग आराखडा तयार करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. मात्र, त्यानंतर फेब्रुवारीत होणारी पिंपरीसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणूक ही दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल, अशी भविष्यवाणी चिखले यांनी केली आहे. सध्याची चार सदस्य प्रभाग पद्धती ही राज्यातील सत्ताधाऱ्यांना व त्यातही पिंपरी महापालिकेत याआधी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सोईची नसल्याने एक सदस्यीयची आवई उठवून प्रत्यक्षात ती व्दिसदस्यीय पद्धतीनेच होईल, असेही ते म्हणाले.

पक्षाची विचारधारा तळागाळात पोचवण्यासाठी मनसैनिकांनी दंड थोपटले असून, प्रभागातील सक्षम चेह-यांना मनसेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या मजबूत बांधणीसाठी मनसैनिकांनी कंबर कसली आहे. पक्षबांधणीसाठी प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा कार्यक्रम पक्षाच्या शहरातील पदाधिका-यांनी हाती घेतला आहे.

मनसेचे शहरातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामांना केलेला विरोध आणि त्यामुळे झालेली कामे लोकांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. आगामी काळामध्ये विकासकामे करण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून पक्षाला नागरिकांच्या पुढे नेण्यात येणार आहे. मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न पणाला लावण्यात येणार आहेत, असे चिखले यांनी सांगितले. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in