गुड न्यूज : 'हाफकिन'कडून वर्षाला मिळणार कोव्हॅक्सिनचे 22 कोटी डोस - haffkine will produce 22 crore covaxin doses annually | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

गुड न्यूज : 'हाफकिन'कडून वर्षाला मिळणार कोव्हॅक्सिनचे 22 कोटी डोस

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. आता हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. 

फिरोजाबाद : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. असे असले तरी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (Haffkine) लवकरच कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचे उत्पादन सुरू करणार आहे. हाफकिन वर्षाला कोव्हॅक्सिनच्या 22.8 कोटी डोसचे उत्पादन करणार आहे.  

हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप राठोड म्हणाले की, आम्हाला जैवतंत्रज्ञान विभागाने कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. मिशन कोविड सुरक्षा या अंतर्गत ही परवानगी मिळाली आहे. आम्ही 8 महिन्यांत उत्पादन सुरू करीत आहोत. वर्षाला आम्ही 22.8 कोटी डोसचे उत्पादन करु. यासाठी आम्हाला केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे आर्थिक साह्य मिळाले आहे. याचबरोबर राज्य सरकारकडूनही 93 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. 

हेही वाचा : नो व्हॅक्सिन नो सॅलरी! सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सक्ती 

तंत्रज्ञान हस्तांतराच्या प्रक्रियेसाठी आम्ही भारत बायोटेकशी चर्चा करीत आहोत. भारत बायोटेकसोबत आम्ही गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, परस्पर सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना लशीच्या उत्पादनासाठी बायोसेफ्टी लॅब (बीएसएल) सुरु करण्यात आली आहे. उत्पादनाची सुविधा सुरू करण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागेल. सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्यास नियोजित वेळेत लस उत्पादन सुरू होईल. आम्ही सुरवातीला दरमहा 2 कोटी डोसचे उत्पादन घेऊ. या वेगाने वर्षातील 11 महिने उत्पादन घेऊ आणि 22.8 कोटी डोसचे उत्पादन घेऊ. कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी बीएसएल-3 लॅबची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. 
 
देशात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख