नो व्हॅक्सिन नो सॅलरी! सरकारी कर्मचाऱ्यांना आता कोरोना लशीची सक्ती - no vaccine no salary policy for government employees in uttar pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

नो व्हॅक्सिन नो सॅलरी! सरकारी कर्मचाऱ्यांना आता कोरोना लशीची सक्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. 

फिरोजाबाद : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employee) लस घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. लस न घेतल्यास वेतन मिळणार नाही, अशी तंबीही देण्यात आली आहे. या सक्तीबद्दल अनेक जण नाराजी व्यक्त करीत आहेत. 

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्हा प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेण्याची सक्ती केली आहे. कर्मचारी लस  घेत नाहीत तोपर्यंत त्यांना पगार मिळणार नाही. याविषयी मुख्य विकास अधिकारी चरचित गौर म्हणाले की, जिल्हाधिकारी चंद्रविजय सिंह यांनी लस न घेतल्यास वेतन न देण्याचा तोंडी आदेश दिला आहे. या आदेशानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा मे महिन्यापासूनचा पगार थांबवण्यात येईल. 

हेही वाचा : डीआरडीओचे कोरोनावरील औषध घेताय? आधी या इशाऱ्याकडे लक्ष द्या...

जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांच्या प्रमुखांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली आहे. सर्व कर्मचाऱ्यांची यादी करुन त्यांना लस मिळेल हे पाहण्याची सूचना देण्यात आली आहे. अनेक कर्मचारी आता पगार थांबण्याच्या भीतीने लसीकरण करुन घेऊ लागले आहेत. 

भारतात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख