राणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली!

भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, ही ऑफर देणारा मीच प्रथम होतो, असा दावा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
राणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली!
gulabrao patil says he first invited pankaja munde in shivsena

जळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे डोकं फिरलयासारखी परिस्थिती आहे, असा सणसणीत टोला राज्याचे मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. भाजप (BJP) नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसेनेत (Shivsena) यावे, ही ऑफर देणारा मीच प्रथम होतो, असाही दावा त्यांनी केला. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे ही ऑफर प्रथम मीच दिली. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा विषय सुरू झाला तेव्हा मी त्यांनी शिवसेनेत यावे त्यांचा सन्मान होईल, असे मत व्यक्त केले होते. आजही माझे तेच मत आहे. त्यांचे शिवसेनेत स्वागत आहे.
राणेंच डोकं फिरलया 

कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर टीका केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, राज्यावर संकट आले असताना मानवता या धर्मातून केवळ मदत हाच विषय आला पाहिजे. त्यात कोणतेही राजकारण कुणीही करू नये, मात्र नारायण राणे यांच्या बाबतीत मात्र डोकं फिरलयासारखी परिस्थिती आहे. 

नारायण राणे यांनी नुकताच पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या वेळी नारायण राणे अधिकाऱ्यांना झापले होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही एकेरी उल्लेख केला होता. यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. याला शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनीही उत्तर दिले होते. 

चिपळूणमध्ये दौऱ्यावर असताना प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, असा आरोप राणे यांनी केला होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले होते की, प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम, प्रोटोकॉल माहिती नाही. एकही अधिकारी मला भेटला नाही. विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री आले असताना नाही ते आले नाहीत. त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवले तर मी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही. मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले, ते पाहुणे आहेत का? पुढीलवेळी मी न सांगता येईन, मग बघू.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in