वाढदिवशी मोदींना 'दोन कोटींचं' गिफ्ट पण चीनचा विक्रम नाही मोडला!

सरकारने कोरोना लसीकरणाचा आज नवा विक्रम केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे करण्यात आले.
government gives 2 crore doses covid vaccine in one day
government gives 2 crore doses covid vaccine in one day

नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणाचा (Covid Vaccination) आज नवा विक्रम केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवसाचे औचित्य साधून हे करण्यात आले असून, सरकारने अडीच कोटी कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठरवले होते. आज दिवसभरात तब्बल दोन कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली परंतु, चीनचा विक्रम मोडता आला नाही. 

कोरोना लसीकरणाचा विक्रम चीनच्या नावावर आहे. चीनने एकाच दिवशी तब्बल 2.47 कोटी नागरिकांना कोरोना लस दिली होती. केंद्र सरकारने चीनचा विक्रम मोडीत काढण्याचे उद्दिष्ट्य ठरवले होते. आज दुपारी 1.30 वाजेपर्यंत एक कोटी डोस देण्यात आले होते. यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटरवर नागरिकांना कोरोना लसीकरणाचे आवाहन करण्यास सुरवात केली. त्यानंतर सायंकाळपर्यंत एकूण 2 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. 

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आनंद व्यक्त केला.  ते म्हणाले की, लससेवा करताना आरोग्य कर्मचारी आणि देशवासियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनोखे गिफ्ट दिले आहे. मोदींच्या वाढदिवशी भारताने नवा विक्रम स्थापित केला आहे. एकाच दिवसात 2 कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक आकडा आपण पार केला आहे. वेल डन इंडिया!  

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com