देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये मुंबईतच पेट्रोल अन् डिझेल सर्वाधिक महाग - in four metro cities petrol and diesel is more costly in mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये मुंबईतच पेट्रोल अन् डिझेल सर्वाधिक महाग

वृत्तसंस्था
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी दरवाढीचा भडका उडाला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महागडे आहे. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (स्रोत : इंडियन ऑईल) 
दिल्ली : पेट्रोल - 91.17, डिझेल - 81.47 
मुंबई : पेट्रोल - 97.57, डिझेल - 88.60 
चेन्नई : पेट्रोल - 93.11, डिझेल - 86.45 
कोलकता : पेट्रोल 91.35, डिझेल - 84.35 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. मागील तीन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 15 पैसै वाढ झाली असून, दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपयांवर गेले आहे. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.57 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.47 रुपये आणि मुंबईत 88.60 रुपयांवर गेला आहे. 

हेही वाचा : चहावाला पंतप्रधान झाल्यावर दुसरं काय होणार...

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. पेट्रोलवर केंद्र व राज्याचा 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९ रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होताना दिसत नाहीत. 

आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतुकीचा तसेच, पणन खर्च आणि नफा असे मिळून सुमारे ३.७५ रुपये प्रतिलिटर होतात. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू होते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४ रुपये, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क १८ रुपये असे मिळून ३२.९ रुपयांचे विविध कर केंद्र सरकारकडून आकारले जातात. महाराष्ट्र सरकार त्यावर २५ टक्के व्हॅट म्हणजेच १६.६६ रुपये आणि १०.१२ रुपये अतिरिक्त कर लावतो. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरले जातात. याचप्रमाणे डिझेलचे दरसुद्धा ठरवण्यात येतात. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख