कसाबलाही कायद्याद्वारे संधी मिळाली होती; अनिल देशमुखांचा युक्तीवाद - Even kasab got benefit of rule of law says Anil Deshmukh to High Court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

कसाबलाही कायद्याद्वारे संधी मिळाली होती; अनिल देशमुखांचा युक्तीवाद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

देशमुख यांनी न्यायालयात सीबीआयची चौकशी बेकायदेशीर असल्याचे सांगितले.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सीबीआय (CBI) व ईडी (ED) कडून चौकशी सुरू आहे. त्यावर आज देशमुख यांनी न्यायालयात सीबीआयची चौकशी बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यामध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कायद्याने कसाबलाही आपली बाजू माडंण्याची संधी दिली होती, असा युक्तीवाद देशमुख यांच्यावतीनं करण्यात आला. (Even kasab got benefit of rule of law says Anil Deshmukh to High Court)

देशमुख यांच्यावतीनं ज्येष्ठ विधिज्ञ अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एप्रिल महिन्यात सीबीआय चौकशी सुरू केली होती. पण या केंद्रीय संस्थेने त्यासाठी महाराष्ट्र सरकारची पूर्वपरवानगी घेतली नाही. कारण देशमुख हे त्यावेळी राज्याचे मंत्री होते. परवानगी न घेता देशमुख यांची भ्रष्टाराच्या प्रकरणात चौकशी करणे बेकायदेशीर ठरते. आपण कायद्याला बगल देणार का? असा सवाल उपस्थित करत देसाई यांनी ही संपूर्ण चौकशीच बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात केला.

हेही वाचा : तुषार मेहतांनी नाकारली विरोधी पक्षनेत्यांना भेट अन् सत्ताधारी पक्षाचं थेट मोदींना पत्र

आपण नियम आणि कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊ शकत नाही. या देशात 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यातील अजमल कसाबलाही कायद्यानुसार आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. देशातील प्रत्येकाला अशी संधी मिळते, असंही देसाई यांनी नमूद केलं. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. एम. जमादार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याला न्यायालयात आव्हान दिलं आहे. जयश्री पाटील यांनी तक्रारीनंतर मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले होते. 

देसाई यांनी न्यायालयात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कमल 17 ए चा उल्लेख न्यायालयात केला. या कलमानुसार शासकीय सेवेतील व्यक्तीची चौकशी करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी न्यायालयात सांगितले. तसेच सीबीआयने दाखल केलेला गुन्हा केवळ ऐकीव माहिती आणि आरोपांच्या आधारावर दाखल केला आहे. असे आरोप कुणीही दररोज करतात. जर प्रत्येक आरोपावर विश्वास ठेवला तर अराजकता निर्माण होईल, असेही देसाई न्यायालयात म्हणाले. या प्रकरणावर पुढील सुनावणी पाच जुलै रोजी होणार आहे. 

दरम्यान, देशमुख यांची चौकशी ईडीमार्फतही केली जात आहे. त्यांच्या दोन सहाय्यकांना ईडीने अटक केली आहे. तसेच देशमुख यांच्या मुंबई व नागपूरमधील घरांचीही झडती घेण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. पण त्यांनी कोरोना व वयाचं कारण देत चौकशीला जाणं टाळलं. तसेच ऑनलाईन चौकशीसाठी आपण उपलब्ध असल्याचं पत्र ईडीला दिलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख