देशमुखांची पुन्हा एकदा हुलकावणी अन् 'ईडी' म्हणाली, ते गायब असून त्यांचा पत्ता आम्हालाही सापडेना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने चौथ्यांदा समन्स बजावले होते. परंतु, त्यांनी पुन्हा एकदा ईडीला हुलकावणी दिली आहे.
ed says anil deshmukh exact location is known to us
ed says anil deshmukh exact location is known to us

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरू आहे. या प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी देशमुखांसह त्यांच्या मुलाला समन्स बजावण्यात आलं होतं. देशमुखांनी पुन्हा एकदा ईडीला हुलकावणी दिली असून, त्यांचा पत्ता ईडीलाही माहिती नसल्याचे समोर आले आहे. 

ईडीने देशमुखांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवलं आहे. पण त्यांनी वय, आपलं आजारपण व कोरोनाचं कारण देत चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करण्याची विनंती ईडीला केली होती. या प्रकरणात देशमुख ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांच्या याचिकेवर 30 जुलैला सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर लगेचच ईडीने देशमुखांना 2 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे चौथे समन्स पाठविले होते. 

काल पुन्हा एकदा कारण काढून चौकशीला देशमुख हजर राहिले नाहीत. याबद्दल बोलताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होत नाही. ते कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. त्यांचा नेमका ठावठिकाणा आम्हाला सापडत नाही. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ते तपासाला सहकार्य करतील, अशी आशा आम्हाला आहे. 

ईडीचे हे चौथे समन्स पाहून देशमुख यांनी आपल्याला धक्का बसल्याचे उत्तर ईडीला दिले होते. त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ईडीच्या कार्यालयात देशमुख यांचं उत्तर सादर केले होते. समन्सची वेळ पाहून निराश झाल्याचे आणि धक्का बसल्याचे यात नमूद करण्यात आले होते. या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही चौकशी चुकीच्या हेतूने आणि कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप देशमुखांनी याचिकेत केला आहे. देशमुख यांनी आपल्याला वाटणारी भीती आता खरी ठरत असल्याचेही उत्तरात म्हटले होते. ईडीकडून सुरू असलेली चौकशी निष्पक्ष नाही. ईडीकडून अधिकार आणि आपल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या एक दिवस आधीच समन्स पाठवल्याने माझी भीती खरी ठरत आहे, असेही देशमुख यांनी म्हटले होते. 

दरम्यान, देशमुखांवर मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये देशमुखांचे खासगी सचिव व सहायकाला अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडूनही देशमुखांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे देशमुख सध्या ईडी व सीबीआयच्या कात्रीत सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या याचिकेवर काय निकाल देणार, यावरच ईडीसमोर हजर राहण्याबाबत त्यांचा निर्णय अवलंबून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com