पोलिसांच्या त्रोटक केस डायरीने घात केला अन् राणेंचा अर्णव गोस्वामी झाला!

नारायण राणे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास न करता त्यात राणेंच्या अटकेची घाई केल्याने त्यांना काही तासातच जामीन मिळाल्याचे न्यायालयीन निकालातून समोर आले आहे.
due to incomplete case diary narayan rane gets bail
due to incomplete case diary narayan rane gets bail

पिंपरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्धच्या  गुन्ह्याचा पोलिसांनी तपास न करता त्यात राणेंच्या अटकेची घाई केल्याने त्यांना काही तासातच जामीन मिळाल्याचे न्यायालयीन निकालातून समोर आले आहे. यातून पोलीस व राज्य सरकारची, मात्र नाचक्की झाली. अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) प्रकरणातही असेच घडले होते. त्याचीच राणे प्रकरणात पुनरावृत्ती झाली. नारायण राणेंचा अर्णव गोस्वामी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत होती. अखेर ती खरी ठरली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या थोबाडीत मारली असती, असे वक्तव्य राणे यांनी पत्रकार परिषदेत केले होते.त्याबद्दल तेढ निर्माण करण्यासह अवमानाचा गुन्हा महाड पोलिसांनी काल (ता.24) दाखल करून त्यात राणेंना कालच दुपारी अटक केली. असेच गुन्हे पुणे, नाशिकलाही दाखल झाले आहेत. तर, पिंपरीतही तशा तीन तक्रारी पोलिसांत देण्यात आल्या असून त्यावर कार्यवाही बाकी आहे. मात्र, महाडच्या गुन्ह्यात पोलिसांच्या त्रोटक केस डायरीने पोलिसांचाच घात केला आणि राणेंना जामीन मिळाला, असेच काल रात्री उशिरा महाड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणेंना दिलेल्या जामिनातून स्पष्ट झाले आहे. 

तपशीलवारपणे केस डायरी बनवून ती न्यायालयाला सादर करण्यात आली नव्हती. ती फक्त दोन पानांतच दिल्याचे न्यायालयानेही नमूद केले आहे. फौजदारी दंड संहिता प्रक्रियेच्या (सीआरपीसी) कलम १७२ (१-ब) नुसार दाखल गुन्ह्याचा तपास प्रथम करावा लागतो. त्यानंतर त्यात आरोपीच्या अटकेची आवश्यकता असेल, तर ती का आहे, हे ही केस डायरीत नमूद करावे लागते. पण, तसे काही राणेंविरुद्ध महाड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत घडले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

या गुन्ह्याचे तपासाधिकारी या कलमानुसार  वागले नसल्याचा शेराही त्यांनी मारला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कलम ४१ ची नोटीसही आरोपीला देण्यात आली नाही, ही बाबही पोलिस कोठडी न मिळता आरोपीला न्यायालयीन कोठडीसाठी पथ्यावर पडली. जेणेकरून ती मिळताच लगेच त्यांना जामीन झाला. आरोपीने पोलिसांसमोर वक्तव्य केले असून ते माध्यमांत उपलब्ध आहे. त्यामुळेही त्याच्या पोलिस कोठडीची गरज नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त करीत राणेंना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती.

त्यानंतर त्यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी लगेचच जामिनासाठी अर्ज केला. आरोपीचे वय ६९ असून ते तपासाला सहकार्य करतील, फरार होणार नाहीत, असं वक्तव्य ते पुन्हा करणार नाहीत, असे त्यांनी न्यायालयाला सांगत (पण,तशी लेखी कबुली, मात्र दिली नाही) आरोपीला जामीन देण्याची विनंती केली. त्याला जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी व सहाय्यक सरकारी वकील प्रकाश जोशी यांनी आक्षेप घेतला.आरोपी पुन्हा असे वक्तव्य करण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन दिला.

दरम्यान, महाडमधील गुन्ह्याच्या तपासात केलेली घाई पोलिसांना आता नाशिक व पुण्यात करून चालणार नाही. केस डायरी व्यवस्थित व तपशीलवार तयार करून सादर कऱण्याचा धडा त्यांना काल मिळाला आहे. दरम्यान, आपल्याविरुद्धचे दाखल सर्व गुन्हे रद्दच करण्यासाठी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात आज धाव घेतली. तो ही निकाल त्यांच्या बाजूने गेला, तर मात्र पोलिसांना सावकाश व सखोलही तपास करण्याची गरजच उरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com