अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान अन् ट्रम्प म्हणतात, बायडन राजीनामा द्या!

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केली आहे. यावरुन जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
donald trump demands resignation of us president joe biden
donald trump demands resignation of us president joe biden

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. यावरुन जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुन अमेरिकेतील वातावरणही तापले आहे. या प्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोंडीत पकडले आहे. बायडन यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या घडामोडींमुळे जगभरातील अनेक देशांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी बायडन यांना जबाबदार धरले आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावण्याची प्रक्रिया ट्रम्प यांनी मागील वर्षी सुरू केली होती. यासाठी त्यांनी दोहा येथे तालिबानशी चर्चाही केली होती. त्यावेळी सैन्य माघारीची अंतिम मुदत मे 2021 ठरवण्यात आली होती. तसेच, अमेरिकी सैन्याचा सुरक्षिततेचीही हमी घेण्यात आली होती. बायडन यांनी सत्तेवर आल्यानंतर ही मुदत वाढवली परंतु, त्यांनी तालिबानकडून कोणतीही सुरक्षिततेची हमी घेतली नाही. 

याविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये बायडन यांनी महान कार्य केले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा पराभव म्हणून नोंदवला जाईल. अफगाणिस्तानमध्ये जे काही घडले त्यामुळे मोठी नाचक्की झाली आहे. यामुळे बायडन यांनी आता राजीनामा द्यावा. अमेरिकेत कोरोना प्रसार, स्थलांतर, आर्थिक आणि ऊर्जा धोरणे यात बायडन अपयशी ठरले आहेत.   

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. 

तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com