काबूल विमानतळावर धुमश्चक्री; गोळीबारात 5 ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत.
amid chaos five persons killed at kabul airport in firing
amid chaos five persons killed at kabul airport in firing

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul) विमानतळावर हजारो जणांनी विमान पकडण्यासाठी गर्दी केली आहे. विमानात बसण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की आणि भांडणे सुरू आहेत. विमानतळावर धुमश्चक्री होऊन गोळीबारात 5 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. 

अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची सुरक्षा करीत आहेत. लोकांचा लोंढा विमानतळावर येत असून, त्याला रोखणे अमेरिकी सैनिकांनी अवघड जात आहे. दरम्यान, हजारो जणांनी विमानतळावर गर्दी केल्याने गोंधळ वाढला आहे. विमानात घुसण्याचा प्रयत्न हजारो प्रवासी करीत आहेत. यातच विमानतळावर धुमश्चक्री होऊन गोळीबार झाला. यात 5 जण ठार झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. 

काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानात बसण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानात बसण्यासाठी लोक धक्काबुक्की करीत आहेत. त्याचबरोबर विमानाला लोंबकळत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विमानाच्या जिन्याला लोंबकळून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. लोकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. 

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. 

तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.

घनी हे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिद आणि दुसऱ्या निकटवर्ती सहकाऱ्यासह देश सोडून गेले आहेत. दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर तालिबानने अध्यक्षीय भवनही ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली आलंेआहे. मागील सुमारे 100 दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानला जेरीस आणले होते. एक-एक राज्य काबीज करत त्यांनी अखेर रविवारी संपूर्ण देशावर कब्जा केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com