कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक जीवघेणा अन् त्यावरील लशीचा परिणामही अनिश्चित : डब्लूएचओ

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, लशीच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
covid 19 indian variant is more dangerous says world health organistation
covid 19 indian variant is more dangerous says world health organistation

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, लशीच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात आढळणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर लशीच्या परिणारकारकेतबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शंका व्यक्त केली आहे. या विषाणूच्या म्युटेशनमुळे त्यावर लशीचा परिणाम अनिश्चित आहे, असे संघटनेने म्हटले आहे. तसेच, हा कोरोना विषाणूचा प्रकार अधिक संसर्ग पसरवणारा आणि जीवघेणा असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. 

भारतात आढळणारा कोरोना विषाणूचा प्रकार बी.1.617 हा पहिल्यांदा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडला. आता जगभरातील 44 देशांमध्ये सापडला आहे. हा विषाणू अतिशय वेगाने संसर्ग पसरवणारा आहे. भारतातील सुमारे 0.1 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोस सिक्वेन्स तपासणी करण्यात आली आहे. 

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सापडणारा बी.1.17 आणि भारतात सापडणारा बी.1.617 मागील काही आठवड्यांपासून काही कमी होऊ लागले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे आणखी धोकादायक म्युटेशन्स तयार झाले असून, ते बी.1.617.1 आणि बी.1.617.2 आहेत. बी.1.617 पासून तयार झालेले नवीन प्रकार अधिक संसर्ग पसरवणारे आहे. 

बी.1.617 या प्रकारावर लस आणि औषधांचा प्रभाव तसेच, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका या गोष्टींबाबत अनिश्चितता आहे. यावर प्राथमिक अभ्यास झाला असला तरी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. फायजर आणि मॉडर्ना यांच्या लशीची प्रभावही या प्रकारावर मर्यादित स्वरुपातच दिसून आला आहे, असे डब्लूएचओने म्हटले आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com