सावधान ! म्युकर मायकोसिस घातकच - Be careful! Mucous mycosis is fatal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

सावधान ! म्युकर मायकोसिस घातकच

विलास कुलकर्णी
शनिवार, 15 मे 2021

रक्तातील साखर वाढलेली असताना आणि "न्यूट्रोफिल' या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी (न्युट्रोपेनिया) झाल्यानंतर या बुरशीचे इन्फेक्‍शन होते.

राहुरी : ब्लॅक फंगसचे (एक प्रकारची बुरशी) शास्त्रीय नाव म्युकर मायकोसिस (Mucous mycosis) आहे. माती, पाला-पाचोळा व प्राण्यांच्या शेणामध्ये ती सापडते. त्याचे बीज हवेतून वातावरणात पसरतात. श्वासातून ते नाकात जातात. निरोगी मनुष्यामध्ये ते घातक नसतात, परंतु मधुमेह नियंत्रित नसणाऱ्या रुग्णांमध्ये जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तेव्हा म्युकरमायकोसिसचे इन्फेक्‍शन होऊ शकते. सध्या तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. (Be careful! Mucous mycosis is fatal)

इन्फेक्‍शनमध्ये नेमके काय होते? 

रक्तातील साखर वाढलेली असताना आणि "न्यूट्रोफिल' या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी (न्युट्रोपेनिया) झाल्यानंतर या बुरशीचे इन्फेक्‍शन होते. मुख्यतः नाक आणि नाका जवळच्या हवेच्या पोकळ्या (सायनस) यामध्ये ही बुरशी पसरते. मग जवळच्या रक्तवाहिन्यांमधून मेंदूपर्यंत जाऊ शकते. आजूबाजूंच्या हाडांनाही पोखरते. डोळ्याला व मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यामधून होणारा रक्तपुरवठा अडवते. मग रक्ताच्या गुठळ्या होऊन दृष्टी जाणे किंवा मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी होऊन अर्धांगवायू होणे, असे प्रकार संभवतात. 

अशी आहेत लक्षणे 

नाक बंद वाटणे, नाकामधून रक्तमिश्रित पाणी येणे, चेहऱ्यावरती सूज येणे, चेहऱ्यावर दुखणे किंवा डोळा सुजणे, एक प्रकारचा बधीरपणा नाकाच्या आजूबाजूच्या त्वचेवर जाणवणे, दिसायला कमी वाटणे, डोळ्यांची हालचाल कमी जाणवणे किंवा हालचाल करताना दुखणे, डोकेदुखी होणे, ताप येणे इत्यादी. 

कोरोनाच्या रुग्णांना धोका असतो का? 

कोविडचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. कोरोना संसर्ग, विनाकारण किंवा जास्त प्रमाणात दिले गेलेले स्टिरॉइड व टोसिलिझुमाब नावाचे औषध. कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांची रक्तातील साखर, पांढऱ्या पेशी अशा तपासण्या केल्या जात नाहीत. सुरुवातीला काही लक्षणे दिसत नसल्यामुळे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस वाढण्याची शक्‍यता जास्त असते.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय 

असे आहेत उपचार 

लवकर निदान व योग्य उपचार महत्त्वाचे आहेत. उपचारासाठी अंफोटेरिसिन-बी इंजेक्‍शनचा वापर होतो; परंतु बुरशी जास्त पसरल्यास डोळ्याभोवतालचा खराब झालेला भाग काढावा लागतो. सूक्ष्म रक्तवाहिन्या बंद पडल्याने इंजेक्‍शन बुरशीपर्यंत न पोचल्याने बुरशी आणखी वाढतच राहते. इंजेक्‍शनचा किडनीवरही परिणाम होत असल्याने किडनी फंक्‍शन बघावे लागते. त्यामुळे रुग्णाला अतिदक्षता विभागात अनेक तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली दाखल करावे लागते.

तुमची कोरोनासाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली. तरी घाबरुन जाऊ नका. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर नियमितपणे रक्तातील साखर मोजा. ऑक्‍सिजनची पातळी नियमितपणे बघत चला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार घ्या. आजाराच्या सुरुवातीच्या काळात स्टिरॉइड घेणे चुकीचे आणि खूप धोकादायक असते. उपचार सुरू करताना तुमच्या डॉक्‍टरांशी याबाबत चर्चा करा. 

लक्षात ठेवा 
- म्युकरमायकॉसीसवर उपचार अवघड आहेत. 
- बुरशीमुळे खराब झालेला भाग काढण्याची वेळ येते. 
- मेंदूपर्यंत बुरशी गेल्यास जीवाला धोका. 
- स्वतःहून स्टिरॉइड्‌स घेणे टाळा. टोसिलिझुमाब सुद्धा विनाकारण नको. 
- ही नव्याने येऊ घातलेली महामारी मानवनिर्मित आहे. 
- कोरोनाच्या लाटेतून वाचलेल्या रुग्णांचा नाहक बळी जाऊ शकतो. 
- घर व परिसर स्वच्छ ठेवा 

- डॉ. नीलिमा घाडगे 
कान, नाक, घसा तज्ज्ञ 
(मुळ रा. कणगर (ता. राहुरी), सध्या क्वीन्स हॉस्पिटल, लंडन येथे आहेत.)

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख