राजस्थानमध्ये राजकीय संकट; सचिन पायलट पुन्हा दिल्लीत दाखल - congress leader sachin pilot will meet party leadership in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानमध्ये राजकीय संकट; सचिन पायलट पुन्हा दिल्लीत दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जून 2021

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.
 

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली आहे. पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज असलेले पायलट हे दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

सचिन पायलट हे काल (ता.11) सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार आहेत. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पक्ष कायम आपल्याला गृहित धरु शकत नाही, असा गर्भित इशाराही पायलट यांनी दिला आहे. 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

हेही वाचा : रिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात... 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

सचिन पायलट यांनीही आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. दहा महिने होऊनही दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. समितीने मला आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण सरकारचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. राजस्थामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाज ऐकला जात नाही, हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी पायलट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. 

गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूष ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख