रिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात! पायलट यांची गुगली - congress leader sachin pilot slams bjp leader rita bahuguna joshi | Politics Marathi News - Sarkarnama

रिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात! पायलट यांची गुगली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून मोठा धक्का दिला. आता राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांनी पायलट हे भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा केला आहे. यावर पायलट यांनी उत्तर दिले आहे.  

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

उत्तर प्रदेशातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, पायलट हे लवकरच भाजपमध्ये येतील. माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. उत्तर भारतामध्ये काँग्रेस पक्ष आता जवळपास संपला आहे. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

याला पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिनशी फोनवर बोलणे झाल्याचे म्हटले आहे. त्यांचे बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलणे झाले असावे. माझ्याशी थेटपणे बोलण्याचे धाडस त्या दाखवू शकत नाहीत.  

हेही वाचा :  भाजपचा बडा नेता लवकरच पक्षाला करणार रामराम 

दरम्यान, सचिन पायलट यांनीही आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. दहा महिने होऊनही दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. समितीने मला आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण सरकारचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. राजस्थामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाज ऐकला जात नाही, हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी पायलट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. 

गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूष ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख