काँग्रेसचे डोळे अजूनही उघडेनात! सिब्बल यांनी घातले पक्षाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
congress leader kapil sibal slams party over exit of sushmita dev
congress leader kapil sibal slams party over exit of sushmita dev

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) नेत्या सुश्मिता देव (Sushmita Dev) यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सुश्मिता देव यांनी त्यांचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) पाठवला होता. त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. यावरुन ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 

आसाम विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देव यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. सुश्मिता देव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची आई बीथिका देव या आसाम येथील सिल्चर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. देव यांनी पक्ष सोडण्याबद्दल सिब्बल यांनी नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. सिब्बल यांनी म्हटले आहे की, सुश्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे तरुण नेते बाहेर पडत असताना आमच्यासारख्या वृद्धांकडून पक्ष बळकटीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दोष दिला जात आहे. पक्ष अजूनही डोळे बंद ठेवूनच पुढे जात आहे.  

कपिल सिब्बल यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. त्यावेळी सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले होते. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात होते. सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. यातील सर्व नेते या मेजवानीला उपस्थित होते.  या नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वाबाबत नेहमी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता वाढदिवसाच्या मेजवानीतच पक्षाच्या नेतृत्वावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही चर्चा केली आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आणि काँग्रेसला सक्षम अध्यक्ष मिळणे हे दोन महत्वाचे मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर राहिले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिब्बल यांच्या घरी आयोजित मेजवानीतून जी-23 नेत्यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. सर्व विरोधी पक्षांना या नेत्यांनी एक प्रकारे गांधी परिवारालाच आव्हान दिले होते. काँग्रेसच्या नेतृत्वात बदलाची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली होती. भाजपचा सामना करायचा असेल तर काँग्रेसचे नेतृत्व करणारा नेताही तगडा हवा, असाही सूर व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसमधील नेतृत्वाच्या पोकळीचा मुद्दा अनेक विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता. काँग्रेसला आमचा पाठिंबा हवा असेल तर सक्षम नेतृत्व पक्षाकडे हवे, असे विरोधी पक्ष नेत्यांनी सुनावले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com