न्यायालयाने मोठा दिलासा दिला अन् छगन भुजबळ म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
chhagan bhujbal reacts over mumbai session court order
chhagan bhujbal reacts over mumbai session court order

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) गैरव्यवहार प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना शेरोशायरीतून भावना व्यक्त केल्या.  

या निकालावर बोलताना भुजबळ म्हणाले की, सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नही. आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळाला नाही. आमच्यावर खोटेनाटे आरोप लावण्यात आले. विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सवाच्या आधीच आमच्यावरचं संकट दूर झाले. साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर, ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती. त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरचे विघ्न दूर झाले. 

पवारसाहेबांचे आभार, जयंतराव-अजितदादांचे आभार. मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो. न्यायालयाच्या निर्णयानंतर ताबडतोब शरद पवारांना सांगणं अपेक्षित होते. मुख्यमंत्री हे माझ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. काही लोक मला झोपू देणार नाहीत हे मला माहिती आहे. पण मी शांत झोपणार आहे, असेही भुजबळांनी सांगितले. 

तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचे. दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला. आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे, कशाचा कुणाचा द्वेष करायचा. म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष, राग नाही. आमचे सरकार असल्यामुळे माझी सुटका नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली. माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला असून, माझ्यासाठी हा मोठा दिलासा आहे, असे भुजबळांनी नमूद केले. 

या गैरव्यवहार प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव गंगाधर मराठे यांचे नावही वगळण्यात आले आहे. 

दरम्यान, विशेष न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी नुकतेच माजी निरीक्षक अभियंता अरुण देवधर, कृष्णा चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर आणि प्रसन्ना चमणकर यांना या प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते. महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणाचे काम पाहणाऱ्या के. एस. चमणकर एंटरप्राइजेसने तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांच्या कुटुंबीयांना सुमारे १३.५ कोटी रूपये दिल्याच्या अभियोग पक्षाच्या आरोपात तथ्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com