भुजबळ सुटले पण अंजली दमानिया पुन्हा अडचणीत आणणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
anjali damania will challenge session court order in high court
anjali damania will challenge session court order in high court

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचिट दिली आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराच्या आरोपातून भुजबळ मुक्त झाले असून, या प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. 

सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना विशेष न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले होते. महाराष्ट्र सदन नूतनीकरण कंत्राटामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून त्याबाबतचा कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावा आढळलेला नाही, असे निरीक्षण त्यावेळी न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्यात आरोपी असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला दोषमुक्ततेचा अर्ज मात्र अद्याप प्रलंबित होता. आज भुजबळांचे नावही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे. याच गैरव्यवहार प्रकरणात भुजबळ यांना दोन वर्षे कारागृहात काढावी लागली होती. 

या गैरव्यवहार प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव गंगाधर मराठे यांचे नावही वगळण्यात आले आहे. दरम्यान, या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उच्च न्यायालयात जाणार आहेत. सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांना दिलासा दिला असला, तरी दमानिया या त्यांना अडचणीत आणू शकतात. दमानिया यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, छगन भुजबळ,  पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन खटल्यातून वगळण्यात आले आहे.  याला मी उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. 

विशेष न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी नुकतेच माजी निरीक्षक अभियंता अरुण देवधर, कृष्णा चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर आणि प्रसन्ना चमणकर यांना या प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते. महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणाचे काम पाहणाऱ्या के. एस. चमणकर एंटरप्राइजेसने तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांच्या कुटुंबीयांना सुमारे १३.५ कोटी रूपये दिल्याच्या अभियोग पक्षाच्या आरोपात तथ्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com