सरकार पडेल असं रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं! - Chandrakant Patil criticize Mahavikas Aghadi Leaders over Government | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार पडेल असं रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाजपमधील अनेक नेत्यांकडून सातत्यानं भविष्यवाणी केली जाते.

मुंबई : तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाजपमधील अनेक नेत्यांकडून सातत्यानं भविष्यवाणी केली जाते. त्यातच आता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमागे ईडीची पिडा लागली आहे. सरकारला लक्ष्य करण्यासाठीच भाजपचा हा डाव असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारमधील नेत्यांना उद्देशून टोला लगावत पुन्हा एकदा सरकारच्या भवितव्याबाबत भाष्य केलं आहे. (Chandrakant Patil criticize Mahavikas Aghadi Leaders over Government)

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करावे, असं वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असल्याच्या प्रश्नांवर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी या वक्तव्यावरून टोला लगावला. चव्हाण यांचं वक्तव्य हे स्तुतीपर आहे की ..?  असा प्रश्न उपस्थित करून चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणी केल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच रोज सकाळी त्यांना वाटतं की सरकार पडेल पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं, असेही पाटील म्हणाले. 

हेही वाचा : गायब झाल्याच्या चर्चेनंतर देशमुख अवतरले; ईडीसमोर कधी?, याचा केला खुलासा

ओबीसी आरक्षणावर बोलताना पाटील यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. सरकारमधील हे मंत्री खोटं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. ओबीसी समाजाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी पाटील यांनी आशिष शेलार यांचं कौतुक केलं. शेलार उभे राहिले तर मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलताना विचार करावा लागतो, अशी ते तोफ आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 

ओबीसी उमेदवारच देणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झालं असलं तरी आम्ही त्या जागांवर ओबीसी उमेदवारच देणार असल्याचा पुनर्रच्चार पाटील यांनी यावेळी केला. भुजबळांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्याचाही पाटील यांनी समाचार घेतला. 

डाटा केंद्र सरकारकडून घायचा आहे तर मग फडणीसांना कशाला भेटायला गेला, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. मी भुजबळ यांना कोल्हापुरात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केलं होतं. पण ते आले नाहीत, असे पाटील यांनी सांगितलं. पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख