गायब झाल्याच्या आरोपानंतर देशमुख अवतरले; ईडीसमोर कधी?, याचा केला खुलासा - After Supreme Court verdict I will record my statement to ED says Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

गायब झाल्याच्या आरोपानंतर देशमुख अवतरले; ईडीसमोर कधी?, याचा केला खुलासा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

अनिल देखमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला.

मुंबई : कथित शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास ईडीकडून आवळला जात आहे. त्यांना तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. पण त्यानंतर त्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेव्हापासून ते गायब असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ईडीने त्यांच्या कुटूंबियांची 4 कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे. त्यावर सोमवारी देशमुखांनी एक व्हिडीओ तयार करून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (After Supreme Court verdict I will record my statement to ED says Anil Deshmukh)

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला. नागपूरमधील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने तपासणी केली. या ठिकाणी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यामुळे देखमुख यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.  त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमांवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : मोदी सरकारच्या सहा वर्षात 326 गुन्हे; सर्वाधिक भाजपच्या राज्यांत

सोमय्या व्हिडिओमध्ये म्हणतात, 'अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. कोणाला दिसले तर कळवा. एक हजार कोटी रुपयांची माया जमवणाऱ्या अनिल देशमुख यांना ईडी ने तीन नोटीस बजावले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र ते सापडत नाहीत.'  सोमय्या यांच्या व्हिडीओनंतर देशमुखांचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी ईडीसमोर कधी जाणार याबाबत स्पष्ट केलं आहे. 

देशमुख म्हणतात, ईडीने कुटूंबाची चार कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. यामध्ये मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाखांत खरेदी केलेल्या जमिनीचाही समावेश आहे. पण काही माध्यमांमध्ये ही जमीन 300 कोटींची असल्याचे दाखविले जात असून गैरसमज पसरवला जात आहे. ही जमीन 2 कोटी 67 लाख रुपयांची आहे. ईडीचे समन्स आल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझे म्हणणे मांडायला जाणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. 

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता १६ जुलैला जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी अनिल देशमुख यांच्या एका निकटवर्तीयाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.  ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांचे मुळगाव असलेल्या वडविहिरा येथे छापा टाकला.  त्यांच्या काटोल येथील घराची देखील झाडाझडती घेतली. त्यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.  

याआधी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचे संजीव पलांडे यांनी सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख