मोदी सरकारच्या 7 वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के तर डिझेलवरील करात 600 टक्के वाढ

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
central government raised petrol tax 220 percent in last seven years
central government raised petrol tax 220 percent in last seven years

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आता पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. मोदी (Narendra Modi) सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप (BJP) सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आधी वर्षाला 72 हजार 160 कोटी रुपये मिळत होते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या दहा महिन्यांतच सरकारने यातून 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई केली. याचवेळी सर्वसामान्यांचा विचार करता 2014 पासून त्यांच्या उत्पन्नात केवळ 36 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. 

इंधन दरात 4 मेपासून 23 वेळा वाढ 
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज अनुक्रमे 27 पैसे आणि 23 पैशांची वाढ करण्यात आली. ही  4 मेपासून झालेली 23 वी वाढ आहे. या कालावधीत पेट्रोलचा दर 5.72 रुपये आणि डिझेलचा दर 6.25 रुपयांनी वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल 96.12 या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहे. याचवेळी राजस्थानमध्ये डिझेलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि लडाखमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 102.30 रुपये आणि डिझेलचा दर 94.39 रुपये आहे. देशात पेट्रोलचा सर्वाधिक दर राजस्थानमधील गंगानगरमध्ये असून, तो प्रतिलिटर 107.22 रुपये आहे. येथे डिझेलचा दरही प्रतिलिटर 100.05 रुपयांवर गेला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com