भाजपला आणखी एक धक्का; शहांनी चार्टर विमान पाठवलेला नेता तृणमूलच्या वाटेवर - bjp leader rajib banerjee meet tmc state secretary kunal ghosh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजपला आणखी एक धक्का; शहांनी चार्टर विमान पाठवलेला नेता तृणमूलच्या वाटेवर

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जून 2021

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपला गळती लागली आहे. आज भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) आधीच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेले राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee) यांना भाजप प्रवेशासाठी चार्टर विमानाने दिल्लीला नेण्यात आले होते. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) उपस्थितीत त्यांचा भाजप (BJP) प्रवेश झाला होता. आता याच राजीव बॅनर्जींनी पक्ष सोडण्याचे पाऊल उचलले आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांच्या निवासस्थानी बॅनर्जी दाखल झाले असून, त्यांचा थोड्याच वेळात पक्षप्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपला गळती लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय यांची काल (ता.11) घरवापसी झाली. रॉय यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. 

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांच्यासह राजीव बॅनर्जी आणि शमिक भट्टाचार्य यांनी दांडी मारली. त्यामुळे हे नेते तृणमूलमध्ये परततील, अशी चर्चा सुरू झाली होती. रॉय यांची घरवापसी झाली असून, आज राजीव बॅनर्जी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ते तृणमूलचे सरचिटणीस कुणाल घोष यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : प्रियांका गांधींचा फोन येताच पायलट दिल्लीत दाखल 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीआधी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक  नेत्यांना फोडले होते. भाजपमध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्या तृणमूलच्या बंडखोर नेत्यांसाठी अमित शहांनी दिल्लीहून कोलकत्याला चार्टर विमान पाठवण्यात आले. या बंडखोर नेत्यांना चार्टर विमानाने दिल्लीत नेऊन अमित शहांसमोर उभे करण्यात आले. अखेर त्यांचा नाट्यमय पद्धतीने पक्षप्रवेश झाला होता. यात तृणमूलचे नेते राजीव बॅनर्जी यांचा समावेश होता. 

काही दिवसांपूर्वीच पक्षाला सुनावले 
माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी नुकतीच भाजप नेतृत्वालाच सुनावण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देणे हे चुकीचे आहे. राज्यात बहुमताने निवडून आलेल्या ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने अशी पावले उचलू नयेत. याचे बंगालमधील जनता स्वागत करणार नाही. याऐवजी कोरोना महामारी आणि यास चक्रीवादळामुळे झालेले नुकसान यावर भाजपने भर द्यावा. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख