प्रियांका गांधींचा फोन आला अन् तातडीने सचिन पायलट दिल्लीत - after congress leader priyanka gandhi phone call sachin pilot reach delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

प्रियांका गांधींचा फोन आला अन् तातडीने सचिन पायलट दिल्लीत

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जून 2021

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यामुळे काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली आहे. पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज असलेले पायलट हे दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पायलट यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सचिन पायलट हे काल (ता.11) सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार आहेत. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पक्ष कायम आपल्याला गृहित धरु शकत नाही, असा गर्भित इशाराही पायलट यांनी दिला आहे. 

जितिन प्रसाद यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्व सावध झाले आहे. प्रसाद यांच्यानंतर पायलट यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे प्रियांका गांधींनी पायलट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. लवकरच पायलट यांच्या मागण्यांवर पक्ष नेतृत्व कार्यवाही करेल, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले आहे. पायलट यांना भेटण्यासाठी एका नेत्यालाही पाठवण्यात आले होते. अखेर प्रियांका गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर पायलट यांनी दिल्ली गाठली. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट पायलट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : रिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात... 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. 
मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख