गुड न्यूज : आणखी एक मेड इन इंडिया लस आली; सरकारला 30 कोटी डोस मिळणार - central government books 30 crore doses from biological e company | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

गुड न्यूज : आणखी एक मेड इन इंडिया लस आली; सरकारला 30 कोटी डोस मिळणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

कोरोना लशीच्या टंचाईमुळे देशातील लसीकरण मोहिमेला खीळ बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने आता हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई या कंपनीशी करार केला आहे. 

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) लशीच्या टंचाईमुळे देशातील लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination) खीळ बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने आता हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई (Biological-E) या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. सरकारने या कंपनीला 1 हजार 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी दिला असून, कंपनी 30 कोटी डोस देणार आहे. यामुळे सरकारला आता आणखी एक मेड इन इंडिया लस मिळणार आहे. 

या आधी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही मेड इन इंडिया लस उपलब्ध होती. आता या जोडीला बायोलॉजिकल-ई या कंपनीची लस पुढील काही महिन्यांत उपलब्ध होणार आहे. या कंपनीने लशीचे उत्पादन करुन साठा करुन ठेवल्याने ही लस लवकर मिळणार आहे. सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ही लस परिणामकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने बायोलॉजिकल-ई कंपनीला सुरवातीला 100 कोटी रुपयांचे अर्थ साह्य केले होते. याचबरोबर या विभागाने अनेक संशोधनात कंपनीसोबत भागीदारी केली आहे. देशातील लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देण्यासोबत प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. याचबरोबर सरकारी आणखी पाच ते सहा लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे.  केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. 

आता स्पुटनिक व्ही भारतात दाखल झाली असून, बायोलॉजिकल-ईची लसही उपलब्ध होणार आहे. याचबरोबर सरकार फायजर आणि मॉडर्ना या परदेशी लस उत्पादक कंपन्यांशीही चर्चा करीत आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. लस टंचाईमुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. यामुळे सरकारने लस खरेदीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. 

हेही वाचा : कोरोनाची तिसरी लाट 98 दिवस येणार, एसबीआयचा अंदाज 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख