मी काय पक्षाचा वेठबिगार नाही! भाजप आमदाराचा घरचा आहेर

भाजपच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन या आमदाराला पक्षातूनच लक्ष्य करण्यात येऊ लागल्याने त्याने अखेर उत्तर दिले आहे.
bjp mla preetham gowda says he is not bonded labourer of party
bjp mla preetham gowda says he is not bonded labourer of party

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. बोम्मई यांनी माजी पंतप्रधान एच.डी.देवैगौडा (H.D.Devegowda) यांची भेट घेतली होती. यावरुन गदारोळ सुरू झाला असून, याबाबत भाजपच्या (BJP) आमदाराने प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन या आमदाराला पक्षातूनच लक्ष्य करण्यात येऊ लागल्याने त्याने अखेर उत्तर दिले आहे. 

बोम्मई यांनी मंत्रिमंडळाच्या शपथविधी देवेगौडा यांची भेट घेतली होती. यावर  भाजप आमदार प्रितम जे. गौडा (Preetham Gowda) यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याला मंत्री सोमण्णा यांनी उत्तर दिले होते. ते म्हणाले की, देवेगौडांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेण्यात कोणतीच अडचण नाही. देवैगौडांचे कुटुंब 50 वर्षांपासून राजकारणात आहे. आमदार प्रितम गौडा यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी आमदार आहे. ते आमदार झाले म्हणजे काही देव बनले नाहीत. 

याला आता आमदार गौडा यांनी उत्तर दिले आहे. आमदार काय पक्षाचा वेठबिगार नसतो, असा घरचा आहेर त्यांनी पक्षाला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आम्हाला सन्मान द्या, आम्ही त्याची सन्मानाने परतफेड करू. येथे कुणीही पक्षाचा वेठबिगार म्हणून काम करीत नाही. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता बोम्मई यांनी माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.देवैगौडा यांची घेतलेली भेट गाजू लागली आहे. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतल्यानंतर आठवडाभराने मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. बोम्मई यांनी नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com