मोदी, ट्रम्प, चीनचे विषाणू युद्ध यांचे कैलास विजयवर्गीयांनी जोडलं 'कनेक्शन'! - bjp leader kailash vijayvargiya blames china for covid second wave in india | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी, ट्रम्प, चीनचे विषाणू युद्ध यांचे कैलास विजयवर्गीयांनी जोडलं 'कनेक्शन'!

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढीचा वेग काहीसा कमी झाला असला तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढीचा वेग काहीसा कमी झाला असला तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3 लाख 15 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी मात्र, या सगळ्यासाठी चीनला (China) जबाबदार धरले आहे. 

मोदी सरकारला केंद्रात सात वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त बोलताना कैलास विजयवर्गीय म्हणाले की, भारतात एवढी मोठी कोरोनाची दुसरी लाट येईल हे कोणालाही वाटले नव्हते. आशियातील इतर देशांमध्ये एवढी मोठी दुसरी लाट आली नाही. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका तसेच, भूतानमध्येही ती नव्हती. सोशल मीडियावर सगळेच जण म्हणत आहेत की कोरोना हा मानवानेच तयार केला आहे. चीननेच जाणीवपूर्वक विषाणू युद्ध खेळल्याचा संशय आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा विषाणू मानवानेच तयार केल्याचा दावा केला होता. 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांच्या पराभवाचे उदाहरण देऊन विजयवर्गीय म्हणाले की,  डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध बिघडल्याने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत चीनने हस्तक्षेप केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लडाखमधील संघर्षानंतर चीनशी संबंध बिघडले आहेत. त्यामुळे देशातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चीन हस्तक्षेप करू शकतो. याबाबतच्या बातम्या मी वृत्तपत्रात वाचल्या आहेत. मी हे सर्व काही म्हणत नसून, अशी चर्चा सुरू आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 847 मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 11 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 847 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 73 लाख 69 हजार 093 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 15 हजार 235 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : फॅक्ट चेक : फ्रिजमधील भाज्या खाल्ल्याने ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो का? 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख