जायंट किलर सुवेंदू बनले विरोधी पक्षनेता : बंगालच्या विधानसभेत आता तृणमूल विरुद्ध माजी तृणमूल नेता - bjp appoints suvendu adhikari as a leader of opposition in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

जायंट किलर सुवेंदू बनले विरोधी पक्षनेता : बंगालच्या विधानसभेत आता तृणमूल विरुद्ध माजी तृणमूल नेता

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

नंदिग्राममध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी जायंट किलर ठरले होते. निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले अधिकारी हे आता विरोधी पक्षनेते बनले आहेत. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली असली तरी नंदिग्राममध्ये (Nandigram) त्यांचा पराभव झाला होता. नंदिग्राममध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) जायंट किलर ठरले होते. निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले अधिकारी हे आता विरोधी पक्षनेते बनले आहेत. यामुळे राज्यातील विधानसभेत तृणमूल विरुद्ध माजी तृणमूल नेता अशी लढाई दिसणार आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

आता ममतांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली आहे. याच अधिकारींनी अतिशय प्रतिष्ठेच्या नंदिग्राममधील लढतीत ममतांना पराभवाचा धक्का दिला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून अधिकारींचा बालेकिल्ला असलेल्या नंदिग्राममध्येच त्यांना आव्हान दिले होते. राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नंदिग्रामच्या विजयाने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 

नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली . त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली. आता नंदिग्राम हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरला आहे. 

ममतांनी निवडणुकीत जाणीवपूर्वक या मतदारसंघाची निवड केली आहे. राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून सत्तांतर झाले होते. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 

हेही वाचा : कोरोना पार्टी कंगना राणावतला पडली महागात...

नंदिग्राममधील मतमोजणीबद्दल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, तृणमूलची फेरमतमोजणीची मागणीही फेटाळण्यात आली होती. या अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला होता आणि त्याच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे ममतांनी म्हटले होते. अधिकाऱ्यावर दबाव आणल्यामुळेच त्याने फेरमतमोजणीस नकार दिला, असा दावाही ममतांनी केला आहे. या अधिकाऱ्याने एसएमएस करुन वरिष्ठांकडे मदत मागितली होती, असेही ममतांनी म्हटले होते. 

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख