'कोरोना पार्टी' पडली महागात..कंगनाला ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामचा दणका - instagram deletes actress kangana ranaut post about covid | Politics Marathi News - Sarkarnama

'कोरोना पार्टी' पडली महागात..कंगनाला ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामचा दणका

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत कोरोना पॉझिटिव्ह सापडली असून, तिने आता नवा वाद ओढवून घेतला आहे.  

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत  (Kangana Ranaut) कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आली आहे. तिनेच इन्स्टाग्रामवर (Instagram) याची माहिती दिली होती. कोरोना हा एका छोटासा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय, असे तारे तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तोडले होते. यामुळे इन्स्टाग्रामने तिची पोस्ट डिलिट करुन तिला दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचे ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. (Instagram deletes Kangana Ranaut post about Covid)  

कंगनाने तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने म्हटले होते की, मागील काही दिवसांपासून मला अशक्तपणा जाणवत होता. तसेच, माझ्या डोळ्यांचीही जळजळ होत होती. मी हिमाचल प्रदेशला जाणार होते. त्यामुळे मी काल कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

मी स्वत: विलगीकरणात गेले असून, हा विषाणू माझ्या शरीरात पार्टी करीत होता हे मला माहितीच नव्हते. कोरोना हा एक छोटासा फ्लू आहे. माझ्या शरीरातून मी त्याला नष्ट करून टाकेन. लोकांना त्याला स्वत:ला विजयी होऊ देऊ नये. तुम्ही त्याला घाबरू नका. तुम्ही घाबरल्यास तो तुम्हाला आणखी घाबरवतो. या विषाणूला प्रसारमाध्यमे आणि काही व्यक्तींना मोठे केले आहे, असे कंगनाने म्हटले होते. 

देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण सापडत असून, हजारो जणांचा मृत्यू कोरोनामुळे होते आहे. असे असतना कंगनाने असंवेदनशीलपणे केलेल्या या पोस्टवर मोठी टीका झाली होती. अनेकांनी तिला याचा जाब विचारला होता. ती चुकीची माहिती पसरवत असल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला होता. अखेर कंगनाने तोडलेल्या या ताऱ्यांमुळे तिची पोस्ट इन्स्टाग्रामने डिलिट केली आहे. 

हेही वाचा : हवेतून ऑक्सिजन मिळवण्यात आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे : गडकरी 

दरम्यान, कंगनाचे ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वी कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. याला कारण आहेत कंगनाची प्रक्षोभक ट्विट. कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले होते. कंगनाचे अकाउंट आधी ट्विटरने तात्पुरते बंद केले होते. 

ट्विटरच्या या कारवाईवर कंगनाचा तिळपापड झाला होता. तिने ट्विटरची गरजच नसल्याची भूमिका घेतली होती. तिने म्हटले होते की, माझा आवाज उठवण्यासाठी माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तसेच, चित्रपटातील माझी कला हा ही एक प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख