सकाळी जाहीर केलेला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार भाजपनं संध्याकाळी खाली बसवला!

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने आता यू-टर्न घेतला आहे.
bjp announces e sreedharan as chief minister candidate in kerala and backtracks it
bjp announces e sreedharan as chief minister candidate in kerala and backtracks it

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले होते. मात्र, सकाळी उमेदवार जाहीर केल्यानंतर संध्याकाळी पक्षाने यू-टर्न घेतला. 

आगामी विधानसभा निवडणुकीत मेट्रोमॅन ई. श्रीधरन हे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी काल (ता.4) केली होती. प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी नुकतीच पक्षाची राज्य निवडणूक समिती जाहीर केली होती. या 16 सदस्यांच्या समितीत श्रीधरन यांनाही स्थान देण्यात आले होते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही याबाबतची घोषणा केली होती. मात्र, सकाळी पक्षाच्या दोन नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून श्रीधरन यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर पक्षाने संध्याकाळी घूमजाव केले. 

सकाळी श्रीधरन यांच्या नावाची घोषणा करणारे मुरलीधरन म्हणाले की, श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाने अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. यानंतर मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोललो. अशा प्रकारे कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मी याबाबत स्पष्टीकरण देत आहे. 

श्रीधरन यांनी काल (ता.4) पलारीवट्टम उड्डाणपुलाच्या कामाला भेट दिली. राज्यातील जनता भाजपला सत्तेत आणेल आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय अपेक्षित आहे, असे श्रीधरन यांनी सांगितले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत होते. 

केरळमध्ये 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले होते. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. 

केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्याने फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com