एकच आमदार असलेल्या राज्यात भाजपने थेट जाहीर केला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, आताभाजपकडून त्यांनामुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
in kerala metro man e sreedharan will be chief ministerial candidate of bjp
in kerala metro man e sreedharan will be chief ministerial candidate of bjp

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये भाजपचा सध्या एकच आमदार आहे. याचबरोबर पक्षाकडून अद्याप तिकिटवाटपही जाहीर झालेले नसताना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत मेट्रोमॅन ई. श्रीधरन हे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी नुकतीच पक्षाची राज्य निवडणूक समिती जाहीर केली होती. या 16 सदस्यांच्या समितीत श्रीधरन यांनाही स्थान देण्यात आले होते. श्रीधरन यांनी आज पलारीवट्टम उड्डाणपुलाच्या कामाला भेट दिली. राज्यातील जनता भाजपला सत्तेत आणेल आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय अपेक्षित आहे, असे श्रीधरन यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे याची जनतेला जाण आहे. भाजपचे सरकार येणार असा मला आत्मविश्वास आहे. मी पक्षाकडे केवळ एकच मागणी केली होती. मी राहत असलेल्या पोन्नानीपासून दूरचा मतदारसंघ नको.  शारिरीक नव्हे तर  मानसिक वय महत्वाचे आहे. मानसिकदृष्ट्या मी सक्षम आणि तरुण आहे. तसेच, माझी प्रकृतीविषयक कोणतीही समस्या नाही. मी काही राजकारण्यांप्रमाणे काम करणार नाही. मी एका तंत्रज्ञाप्रमाणेच काम करणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत होते. मात्र, अखेर भाजपने श्रीधरन यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले आहे. 

दरम्यान, याआधी बोलताना श्रीधरन म्हणाले होते की, भाजपची इच्छा असल्यास मी केरळ विधानसभा निवडणूक लढेन. तसेच, पक्षाने विचारल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासही माझी तयारी आहे. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. याचबरोबर राज्याला कर्जमुक्त करण्यावर भर दिला जाईल. 

केरळमध्ये 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले होते. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. 

केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्याने फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com