शशिकला ठरणार गेमचेंजर...सत्ताधारी अण्णाद्रमुक-भाजप आघाडीचे जहाज तरणार की बुडणार?

तमिळनाडूच्या राजकारणात शशिकलांची पुन्हा एंट्री होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारीअण्णाद्रमुकची भिस्त शशिकलांवरच आहे.
aiadmk is waiting for return of sasikala before tamil nadu assembly election
aiadmk is waiting for return of sasikala before tamil nadu assembly election

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी अचानक राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अण्णाद्रमुकने पुन्हा एकदा शशिकलांसाठी पक्षाची दारे खुली केली आहेत. यामागे आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील बदलणारी राजकीय स्थिती कारणीभूत आहे. आता शशिकला याच पक्षासाठी तारणहार ठरू शकतील, अशी भावना पक्षात वाढीस लागली आहे.  

शशिकलांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. आता पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, अद्याप शशिकलांनी याला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या निर्णयाबद्दल उत्सुकता आहे. 

विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकच्या बाजूने जनमत झुकले असून, शशिकलांचे भाचे अण्णाद्रमुकचे मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे. यावर शशिकलांना पक्षात परत आणणे हाच एकमेव पर्याय समोर उरला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये मतविभाजणी झाली होती. त्यावेळी अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती मात्र, द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या. 

शशिकलांच्या निवृत्तीनंतरही त्यांचे भाचे  व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे प्रमुख दिनकरन यांनी मागे न हटता निवडणूक लढवण्याची घोषणा केली. शशिकला आणि दिनकरन यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झाली होती. त्यावेळी दिनकरन यांनी स्व:तचा एएमएमके पक्ष स्थापन केला होता. त्यांनी जयललितांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ती जिंकून त्यांनी अण्णाद्रमुकला मोठा धक्का दिला होता. याचबरोबर मागील लोकसभा निवडणूकही त्यांच्या पक्षाने लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नव्हती मात्र, त्यांच्या पक्षाच्या मतांचा टक्का 8.46 टक्के होता. त्यांचे उमेदवार राज्यात तिसऱ्या स्थानी होते. त्यांनी प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाल्ली होती. 

दिनकरन यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीतही प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाणार आहे. त्यांच्यासोबत ओवेसी आल्याने त्यांना आणखी बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने हा धोका आधीच ओळखून दिनकरन यांना सोबत घ्यावे, यासाठी अण्णाद्रमुकवर दबाव आणला होता. परंतु, मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. आता शशिकला यांनी राजकीय निवृत्ती घेतली असली तरी आगामी काळात त्या भाच्याचा बाजूने पडद्यामागून सूत्रे हलवू शकतात, अशीही शक्यता आहे.  

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com