भाजपचं अखेर ठरलं...राणेंच्या जागी दरेकर!

नारायण राणेंच्या अटकेवरुन मोठा गदारोळ उडाला असला तरी भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
भाजपचं अखेर ठरलं...राणेंच्या जागी दरेकर!
after narayan rane arrest pravin darekar will lead jan ashirwad yatra

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. अखेर राणेंना पोलिसांनी अटक केली आहे. राणेंच्या अटकेवरुन मोठा गदारोळ उडाला असला तरी भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. ही यात्रा आता राणेंच्या ऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 

राणेंना अटक होण्याआधीच भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू ठेवण्याचे जाहीर केले होते. या यात्रेचे नेतृत्व आता दरेकर यांच्यावर सोपवण्यात आले आहे. दरेकर हे यासाठी रत्नागिरीला रवाना झाले आहेत. दरम्यान, आज दुपारी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नारायण राणेंना पोलिसांना अटक केली तरी भाजपची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. राणेंच्या अनुपस्थितीत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्त्व करतील आणि ती पूर्ण करतील. 

राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला होता. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे राणेंना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. 

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन गेले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in