राहुल गांधींची भेट होताच बंडखोर नेत्याने तलवार म्यान करुन मानलं मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टी. एस. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल या दोघांनीही दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
bhupesh baghel and t s singh deo meet rahul gandhi
bhupesh baghel and t s singh deo meet rahul gandhi

नवी दिल्ली : काँग्रेससची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आता मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) संघर्ष पेटला आहे. विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) या दोघांनीही दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.  

राहुल गांधी यांनी आज बघेल आणि सिंहदेव यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन्ही बैठका सुमारे तीन तास चालल्या. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि छत्तीसगडचे प्रभारी के.एल.पुनिया उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यानंतर सिंहदेव यांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्याचे समजते. पक्षांतर्गत मतभेदांवर उपाय काढण्यासाठी पक्ष नेतृत्व यापुढेही काही बैठका घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या बैठकीमध्ये राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,  असे प्रभारी पुनिया यांनी बैठकीनंतर सांगितले. राहुल गांधीं यांच्यासोबत आज बैठक झाली. छत्तीसगडमधील विकासकामांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, असे सांगून बघेल यांनी मूळ मुद्द्याला बगल दिली. परंतु, दोन्ही नेत्यांची राहुल गांधींनी समजूत काढल्याचे समजते. 

राज्यातील मुख्यमंत्री बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांनी या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला होता. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सचिन पायलट यांच्यातील संघर्षावर काँग्रेस नेतृत्वाला समाधानकारक तोडगा काढता आलेला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक झाले होते. प्रदेशाध्यक्ष पदावरून या दोन्हीही नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद टोकाला पोचला होता. त्यात आता छत्तीसगडचीही भर पडली आहे. तर, मुख्यमंत्री भुपेश बघेल हे गांधी कुटुंबियांच्या खास विश्वासातले मानले जातात. मात्र, या राज्यातही मुख्यमंत्रिपदावरून सरकारमधील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांनी आता उर्वरित अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com