धक्कादायक : 'एएमयू'तील 34 आजी-माजी प्राध्यापकांचा कोरोनाने घेतला बळी; विद्यापीठावर भीतीचे सावट - 34 deaths in aligarh muslim university in last three weeks due to covid | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

धक्कादायक : 'एएमयू'तील 34 आजी-माजी प्राध्यापकांचा कोरोनाने घेतला बळी; विद्यापीठावर भीतीचे सावट

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची लाट आली असून, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोना (covid19) संसर्गाची लाट आली असून, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला (Aligarh Muslim University) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मागील 3 आठवड्यांत विद्यापीठातील 16 प्राध्यापकांचा आणि 18 माजी प्राध्यापकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी थेट भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) पत्र लिहून विद्यापीठातील विषाणू प्रकाराची तपासणी करण्याची विनंती केली आहे.  

विद्यापीठात एवढ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. विद्यापीठात पहिला कोरोना मृत्यू 20 एप्रिलला नोंदवण्यात आला. आतापर्यंत 16 प्राध्यापक आणि 18 माजी प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कुलगुरु तारिक मन्सूर यांच्या मोठ्या बंधूचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. याचबरोबर विद्यापीठातील 16 जणांवर विद्यापीठातीलच जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यात प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. 

कुलगुरू तारिक मन्सूर यांनी आयसीएमआरला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठाच्या आवारात पसरलेला कोरोना विषाणूच्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होच आहेत. या विषाणूच्या प्रकाराचा आयसीएमआरने अभ्यास करावा. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने काही नमुने तपासणीसाठी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या संस्थेकडे पाठवले आहेत. यातून विषाणूचा प्रकार समोर येईल. 

दरम्यान, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य शाहिद अली सिद्दिकी म्हणाले की, रुग्णालयातील 80 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते मागील दोन आठवड्यात कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील तिघांवर रुग्णालयताच उपचार सुरू आहेत तर इतर बरे झाले आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई असून, रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटमधून मिळणारा ऑक्सिजन अपुरा पडू लागला आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू
देशातील कोरोना रुग्णांची संख्याही सोमवारी कमी झाली आहे. सोमवारी 24 तासांत देशात 3 लाख 29 हजार 942 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2 कोटी 29 लाख 92 हजारांवर पोहचला आहे. तर 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू झाले असून एकूण मृत्यूचा आकडा जवळपास अडीच लाखांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. महाराष्ट्रासह चार ते पाच राज्यांतील कोरोना रुग्णांचे देशातील प्रमाणच जवळपास 50 टक्के आहे. त्यामध्ये रविवारपर्यंत महाराष्ट्र आघाडीवर होता. 

हेही वाचा : एकाच रुग्णालयातील तब्बल 80 डॉक्टर कोरोनाबाधित  

सोमवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला. राज्यात 24 तासांत सुमारे 37 हजार रुग्ण आढळले. महाराष्ट्राच्यापुढे कर्नाटक गेले असून काल 39 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर तमिळनाडू सुमारे 29 हजार, केरळ 27 हजार आणि उत्तर प्रदेश 21 हजार ही पाच राज्ये देशातील सर्वात संक्रमित राज्य आहेत.

भारताने कोरोना रुग्णांचा एक कोटींचा टप्पा मागील वर्षी 19 डिसेंबर रोजी ओलांडला होता. तर दोन कोटींचा टप्पा केवळ साडे चार महिन्यांत ओलांडला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मार्च व एप्रिल महिना खूपच घातक ठरला. या कालावधीत देशातील मृतांचा आकडाही वेगाने वाढला आहे. भारताने आता अमेरिका व ब्राझील या देशांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे देशासमोरील चिंता अधिकच वाढत चालली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख