पोलिस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांची मोठी घोषणा - Home Minister Dilip Walse Patil declares police recruitment plan | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 31 डिसेंबरपूर्वी राज्यात पोलिसांच्या पाच हजार जागा भरल्या जाणार आहेत. तसेच ही भरती झाल्यानंतर आणखी सात हजार जागांवर भरती करण्याची ग्वाही वळसे पाटील यांनी दिली. (Home Minister Dilip Walse Patil declares police recruitment plan)

शहर पोलिस तसेच औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीमध्ये त्यांनी परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्ह्यांचा तपास, त्यात मिळणारे यश अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, आयजी एम. प्रसन्ना, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : मेहुल चोकसी तुरूंगाबाहेर; न्यायालयाकडून जामीन मंजूर

भरतीबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी डिसेंबरनंतरही भरती करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. वाझे प्रकरणानंतर पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याच्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना पोलिस ठाण्यात आदराची वागणूक मिळायला हवी. त्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. 

आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याचे सांगत वळसे पाटील म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी केली जात आहे. माध्यमांचा गैरवापर करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ग्रामीण पोलिसांनी गावात संघर्ष निर्माण होण्यासारखी परिस्थिती आटोक्यात आणण्यावर भर दिला आहे. याबाबत वळसे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटूंबाबाबत अनुकंपा भरतीबद्दल सरकारचे धोरण स्पष्ट आहे. हा निर्णय आयुक्त व पोलिस अधीक्षक स्तरावर घेण्यात येईल. या कोरोना योद्ध्यांच्या वारसांना ५० लाख रुपये देण्यात आले असून प्रलंबित प्रस्तावही लवकरात लवकर निकाली काढले जातील, असे वळसे पाटील यानी स्पष्ट केलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख